पुणे: फळभाज्यांची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत घटल्याने लसूण, टोमॅटो, शिमला मिरची आणि घेवड्याच्या दरांत वाढ झाली असून, इतर फळभाज्यांचे दर स्थिर आहेत. काही भाज्यांच्या दरात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागणी वाढल्यास भाज्या महागण्याची शक्यता व्यापा-यांनी वर्तवली आहे.
पुणे बाजार समितीच्या श्री छत्रपती शिवाजी मार्केंट यार्डात रविवारी फळभाज्यांची आवक काही प्रमाणात घटली. गुलटेकडीतील मार्केट यार्डात राज्यातून आणि परराज्यांतून सुमारे ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे ७ ते ८ टेम्पो, कर्नाटक, गुजरातमधून कोबी तीन ते चार टेम्पो, आंध्र प्रदेश, तमिळनाडूतून शेवगा तीन ते चार टेम्पो, राजस्थानातून गाजर ११ ते १२ टेम्पो, कर्नाटकातून घेवडा तीन ते चार टेम्पो, भुईमुगाच्या शेंगा दोन टेम्पो, मध्य प्रदेश, राजस्थान येथून मटार १५ ते १६ ट्रक, पावटा दोन ते तीन टेम्पो, मध्य प्रदेशातून लसणाची पाच ते सहा टेम्पोंची आवक झाली.
फळांचे दर वाढले
डाळिंब, लिंबू आणि पपई या फळांना मागणी वाढल्याने दर वाढले आहेत. कलिंगड, खरबूज, सीताफळ, अननस, संत्री, मोसंबी, चिकू आणि पेरूचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापा-यांनी दिली फुलबाजारात फुलांची आवक साधारण झाली. आवक आणि मागणी यात तफावत नसल्याने दर स्थिर आहेत.
चिकन, मटणाला मागणी वाढली
चिकन, मटण, अंडी यांची मागणी पुन्हा वाढू लागली आहे. गणेशपेठ मासळी बाजारात सर्व प्रकारच्या मासळीच्या दरांत दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. बाजारात खोल समुद्रातील मासळी १० ते १५ टन, खाडीची मासळी १०० ते २०० किलो आणि नदीच्या मासळीची ५०० ते ७०० किलोची आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कटला आणि सिलनचीही सुमारे १५ ते २० टनांची आवक झाली आहे.