16.5 C
Latur
Monday, November 25, 2024
Homeमहाराष्ट्रधनंजय मुंडेंनी कमळ घेतलं असतं तर बरे झाले असते!

धनंजय मुंडेंनी कमळ घेतलं असतं तर बरे झाले असते!

प्रचारसभेत पंकजा मुंडेंचे वक्तव्य

बीड : प्रतिनिधी
एकेकाळी राजकीय वैर असणारे मुंडे बहीण-भाऊ महायुतीच्या माध्यमातून मात्र पुन्हा एकदा एकत्र आल्याचे बघायला मिळाले आहे. ज्या घड्याळाने मुंडे बहीण- भावांना वेगळे केले होते. त्याच घड्याळाने या दोघांनाही आता एकत्र आणले आहे. लोकसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंचा प्रचार केला, तर आता बहीण विधानसभा निवडणुकीत भावासाठी प्रचार करत आहे. केंद्र आणि महाराष्ट्राच्या राजकारणात परळी हे नेहमीच केंद्रबिंदू ठरले आहे.

काका-पुतण्यातील वादानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या काकाची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. पवारांनी देखील गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात धनंजय मुंडे यांना नेहमीच बळ दिले. मात्र पक्ष फुटीनंतर धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आहेत. राष्ट्रवादी महायुतीत सामील झाल्याने विधानसभा निवडणुकीनिमित्त दोघेही मुंडे बहीण-भाऊ एकमेकांचे कौतुक करत आहेत.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी बहीण पंकजा मुंडे यांचा पराभव केला. त्यामुळे दोघा बहीण-भावात राजकीय वैर पाहायला मिळाले. परंतु लोकसभा निवडणुकीत एकेकाळी सहकारी असणा-या बजरंग सोनवणे यांच्या विरोधात धनंजय मुंडे यांनी आक्रमक पवित्रा घेत पंकजा मुंडेंसाठी प्रचार केला. आता विधानसभा निवडणुकीनिमित्त आयोजित सभेत लोकसभेच्या पराजयानंतर माझ्या बहिणीच्या डोळ्यात पाणी नव्हते, मात्र तिने अनेक वर्षे संघर्ष बघितला त्यामुळे मोठ्या बहिणीला कधी जय-पराजयाचा फरक पडला नाही, असे भावनिक भाषण धनंजय मुंडे यांनी केले.

आमचे घर फुटले, महाराष्ट्र बघत होता
विधानसभा निवडणुकीत भावाला निवडून देण्यासाठी पंकजा मुंडे प्रचाराच्या मैदानात उतरल्या आहेत. आमचे घर फुटले आणि महाराष्ट्र बघत होता. बाबा एकटे पडले म्हणून मी राजकारणात आले. मी ज्यावेळेस लोकसभा निवडणुकीला उभी राहिली त्यावेळेस माझा भाऊ माझ्यासोबत आला आणि माझा प्रचार केला. यामुळे मला खूप चांगले वाटले. असे म्हणत या निवडणुकीत आपण एक आहोत, हे सर्वांना दाखवून द्यायचे आहे, असे आवाहन पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR