धाराशिव : प्रतिनिधी
जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यावर वारंवार छापे टाकून कारवाया केल्या जात असल्या तरी निर्ढावलेले व्यवसायिक अवैध धंदे बंद करायला तयार नाहीत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि. १९ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास धाराशिव शहरातील जुना बसडेपो परिसरातील पारधी पेढी येथे छापा टाकला. तेथे सुरू असलेला गावठी दारू निर्मितीचा अड्डा नष्ट केला. जवळपास ३७ हजार रूपये किंमतीची गावठी दारू जप्त केली. या प्रकरणी शहर पोलीस ठाणे येथे एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी दि. १९ जानेवारी रोजी धाराशिव शहरात जुना डेपो परिसरात छापा टाकला. यावेळी आरोपी रतनबाई रमेश पवार यांच्या राहत्या घरासमोर गावठी दारू निर्मिती होत असल्याचे पोलीसांना दिसले. यावेळी पोलीसांनी अंदाजे ३७ हजार ५०० रूपये किंमतीचे ४०० लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव नष्ट केले. ५५ लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी मनाई कायदा कलम- ६५ (ई),अन्वये धाराशिव शहर पोलीस ठाणे येथे रतनबाई पवार यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे.