25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रगणेशोत्सवात झेंडूच्या दराने गाठली शंभरी

गणेशोत्सवात झेंडूच्या दराने गाठली शंभरी

सातारा : प्रतिनिधी
गणेशोत्सवापूर्वी चाळीस रुपये किलो असा दर असलेल्या झेंडूने गणेशोत्सवात मात्र घाऊक बाजारात शंभरी गाठली आहे. उत्सवात दर फुलल्यामुळे झेंडू उत्पादकांना गणराय पावला आहे. वाढीव दरामुळे त्यांच्या चेह-यावर आनंद फुलला आहे.

‘गोल्डन यलो’ आणि ‘गोल्डन ऑरेंज’ जातीची झेंडूची फुले ही किरकोळ बाजारात गणेशोत्सवात ३०० रुपये किलो दराने विकली गेली. गणेशोत्सवापूर्वी बाजारात झेंडूच्या फुलाचे दर पडल्याने शेतक-यांच्या चेह-यावरील चिंता दिसून येत होती. यंदा सतत पाऊस असल्याने झेंडूची लागवड कमी झाली आहे. शिवाय ज्यांनी लागवड केली त्यांचा उगवलेला झेंडूदेखील सततच्या पावसामुळे खराब झाला आहे. दुसरीकडे ढगाळ वातावरणामुळे यंदा झेंडूवर रोगाचा प्रादुर्भावदेखील अधिक प्रमाणात आहे.

सध्या बाजारात लाल, पिवळ्या रंगांची झेंडूची फुले आहेत. यामध्ये लाल-केशरी रंगात ऑरेंज, कलकत्ता, जंबो आदी जाती आहेत; तसेच पिवळ्या रंगात ‘स्मार्ट यलो’, कांचन, श्रावणी जातीची फुले विक्रीसाठी आली आहेत. पिवळ्या झेंडूचा दर शंभर रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. मागणी अधिक असल्याने केशरी रंगाच्या झेंडूचा दर किलोला शंभरी पार करत सव्वाशे झाला आहे. शेवंतीच्या फुलाचीसुद्धा आवक आहे. शेवंतीचा दर सध्या दीडशे ते दोनशे रुपयांपर्यंत आहे. घाऊक बाजारात पुणे व मुंबई येथे सातारा, सांगली येथून जास्त आवक आहे.

फुलबागांचे नुकसान

यंदा महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने फूलबागांचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत कर्नाटकमधील बंगळुरूला जेमतेम पाऊस असल्याने बागा वाचल्या आहेत. पुण्या-मुंबईच्या फुलांच्या घाऊक बाजारात बंगळुरूची फुले सध्या मोठ्या प्रमाणात येत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. स्थानिक फुलांच्या दराला परप्रांतांतील फुलांची स्पर्धा करावी लागत आहे.

कृत्रिम फुलांची स्पर्धा
सणासुदीच्या दिवसांत देवाला हार आणि सजावटीसाठी फुलांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येतो. उत्सव काळात वाढणारे दर यामुळे अलीकडे काही लोक प्लास्टिकच्या कृत्रिम फुलांचे हार, माळा याचा अधिक वापर करतात. जास्त दिवस टिकत असल्याने लोकांचा त्यांकडे कल वाढला आहे. सध्या बाजारात रंगीबेरंगी कृत्रिम फुलांची रेलचेल आहे. त्यांनी ख-या फुलांपुढे स्पर्धा निर्माण केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR