पाटणा : बिहारमध्ये नितीशकुमार यांनी भाजपबरोबर नव्याने स्थापन केलेल्या सरकारचे भवितव्य बिहारमधील २०२५च्या निवडणुकांच्या आतच स्पष्ट होईल, अवघ्या काही महिन्यातच ही आघाडीही फुटणार आहे असे मत रणनीतीकार आणि नेते प्रशांत किशोर यांनी रविवारी व्यक्त केले.
साधारण १७ महिन्यांपूर्वी बिहारमध्ये नितीश यांनी भाजपशी फारकत घेतली होती. तेव्हा, आता नितीश यांच्यासाठी भाजपचे दार कायमचे बंद झाले असल्याचे प्रतिपादन भाजपने केले होते. मात्र आता त्याच नितीश यांच्याशी भाजपने परत एकदा आघाडी केली आहे. भाजपला याची मोठी किंमत चुकवावी लागेल असा दावाही किशोर यांनी केला आहे. नितीश यांनी बदलले भूमिका ही माझ्यासाठी आश्चर्याची बाब मुळीच नाही कारण जेव्हा नितीश महाआघाडीत सहभागी झाले होते तेव्हाच मी सांगितले होते की ते या आघाडीमध्ये फारकाळ राहणार नाहीत असे प्रतिपादनही किशोर यांनी केले आहे.
नितीश यांनी भाजपबरोबर केलेल्या आघाडीवरून बोलताना किशोर म्हणाले, बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप जेव्हा त्यांच्या मतदारांकडे मते मागण्यासाठी जाईल तेव्हा त्यांना त्यांच्या मतदारांना याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल की, भाजपने नितीश यांच्याशी युती का केली? मी आणखी एक भाकीत करतो की. हे सरकार देखील काही महिनेच टिकेल. सत्ता बदलासाठी जन सुराज्य यात्रा कारणीभूत ठरली असल्याचा दावाही किशोर यांनी यावेळी केला.