अर्धापूर : रामराव भालेराव
माजी मुख्यमंत्री, खासदार अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे नांदेड लोकसभेची निवडणूक ही अत्यंत चुरशीची झाली असून येथे काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच लढत होणार आहे. या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ही निवडणूक काँग्रेसच्या अस्तित्वाची तर भाजपच्या प्रतिष्ठेची लढाई असून येथील मतदार ‘कौन बनेगा खासदार’ याचा अंदाज व्यक्त करून अनेक तर्क-वितर्क लावताना दिसून येत आहेत.
मागील अनेक वर्षांपासून नांदेड जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचा चांगलाच दबदबा होता. येथील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था अशोक चव्हाण यांच्या समर्थकांच्या ताब्यात आहेत. अशा परिस्थितीत दस्तुरखुद्द अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानंतर जिल्ह्यातील बहुसंख्य काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांनी ‘साहेब ठरवतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण’ असे समजून ‘साहेब जिथे, आम्ही तिथे’ म्हणत सर्वांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे या जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली. तशी काँग्रेस कमकुवत झाली. परिणामी आजमितीला तरी काँग्रेस पक्षाकडे नेत्यासह कार्यकर्त्यांची वानवा दिसून येत आहे. त्याउलट भाजपामध्ये नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मांदियाळी झाली असून अशा परिस्थितीत काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण आणि भाजप महायुतीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर हे एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
काँग्रेस उमेदवार माजी आमदार वसंतराव चव्हाण हे आज काँग्रेसकडून निवडणूक लढवित असले तरी ते मागील काळात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक राहिले आहेत. तर भाजप उमेदवाराच्या विजयाची संपूर्ण जबाबदारी ही अशोक चव्हाणांनी आपल्या खांद्यांवर घेतली असून आजमितीला ते भाजप उमेदवार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ‘एक पाऊल पुढे’ सरसावले आहेत.
तर त्यांचा मुकाबला करण्यासाठी उरलीसुरली काँग्रेस आणि मित्र पक्षाला सोबत घेऊन काँग्रेस उमेदवार वसंत चव्हाण प्रचारात उतरले आहेत. या प्रचारातून अशोक चव्हाणांवर गद्दारीचे आरोप केले जात आहेत. तर मी नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्याच्या विकासासाठी सर्वसामान्य जनतेचा कौल घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे सांगत विकासासाठी पुन्हा एकदा भाजपला निवडून देण्याचे आवाहन अशोक चव्हाण मतदारांना करीत आहेत. त्यांच्या या आवाहनाला मतदार प्रतिसाद देणार की नाही? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.