मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारकडून सध्या अनेक योजनांच्या घोषणा केल्या जात आहेत. त्यामध्ये लाडकी बहीण, लाडका भाऊ आणि वयोवृद्धांसाठीही काही योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. आता सरकारने केलेली अशीच एक जाहिरात चर्चेत आली आहे. कारण, राज्य सरकारच्या वृद्धांसाठी धार्मिक स्थळाचे दर्शन जाहिरातीत एका ज्येष्ठ नागरिकाचा फोटो चर्चेत आहे. हा वृद्ध इसम गेल्या तीन वर्षांपासून बेपत्ता असून त्याचा फोटो थेट सरकारच्या जाहिरातीत झळकल्याने ही जाहिरात चर्चेत आली आहे.
राज्य सरकारकडून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या योजनेनुसार ६० वर्षे वयावरील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना देशभरातील ६६ तीर्थक्षेत्रांना जाण्यासाठी ही योजना फायद्याची ठरू शकते, असे या योजनेच्या जाहिरातीतून सांगण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेणा-या प्रवाशांना सरकारकडून तब्बल ३० हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे.
याच योजनेच्या जाहिरातीवर छापण्यात आलेल्या वृद्ध व्यक्तीचा फोटो सध्या चर्चेत आला आहे. ही वृद्ध व्यक्ती गेल्या तीन वर्षांपासून घरातून बेपत्ता असून ती थेट मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत झळकल्याने तिच्या कुटुंबियांनाही धक्का बसला आहे. मात्र, आता यावरून राजकारण तापले असून शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.