17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रमंत्रिपदावरून महायुतीत खटके!

मंत्रिपदावरून महायुतीत खटके!

वादग्रस्त नेत्यांना फडणवीसांचा विरोध, शिंदे असहमत

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेत आले आहे. आझाद मैदानात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर एकनाथ शिंदे, अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता महायुतीच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाकोणाला संधी मिळणार, याबद्दल उत्सुकता आहे. फडणवीस यांनी मंत्रिमंडळ स्थापनेची तयारी सुरु केली आहे.

आरोप असलेल्या आमदारांची शिफारस मंत्रिपदांसाठी करू नका, अशी स्पष्ट सूचना फडणवीस यांनी केली. याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनुकूलता दर्शविली. मात्र, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे मंत्री कोण असावेत, हे भाजप नेते ठरवू शकत नाहीत, असे म्हटल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महायुतीत सुरुवातीपासूनच खटके उडत असल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजपच्या वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार फडणवीस यांना त्यांच्या मंत्रिमंडळात नवे आणि स्वच्छ चेहरे हवे आहेत. निवडणूक प्रचार काळात जनतेला दिलेली आश्वासन पूर्ण करण्यासाठी फडणवीस यांना नव्या आणि स्वच्छ चारित्र्याच्या मंत्र्यांची गरज आहे. फडणवीस यांना त्यांच्या नेतृत्त्वात नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात संधी देण्यासाठी ते काही गोष्टी प्रकर्षाने पाहणार आहेत.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या सोबत झालेल्या बैठकीत फडणवीस यांनी स्वच्छ आणि नव्या चेह-यांचा आग्रह धरला. त्याबद्दल चर्चा केली. याबद्दल अजित पवार बरेचसे अनुकूल होते. पण एकनाथ शिंदे यांनी मात्र वेगळाच युक्तिवाद केला. कोणाला मंत्री करायचे ते आम्हाला भाजप सांगू शकत नाही, असे शिंदे बैठकीत म्हणाले, अशी माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्याने दिली.

मंत्र्यांची यादी अद्याप निश्चित नाही
गंभीर गुन्हे दाखल असलेल्या भ्रष्ट नेत्यांना मंत्रिमंडळात संधी दिल्यास त्याचा फटका सरकारच्या प्रतिमेला बसतो. त्याचा परिणाम सरकारच्या कामगिरीवर होतो. शिवाय निवडणुकांमध्येही याचे प्रतिकूल परिणाम दिसतात. त्यामुळे मंत्रिपदासाठी भाजप नेतृत्त्वाने निकष निश्चित केलेले आहेत, असे भाजपच्या नेत्यानं सांगितले. याच कारणामुळे मंत्र्यांची यादी अद्याप निश्चित झालेली नाही. त्यामुळेच आज केवळ तिघांचा शपथविधी झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR