28.7 C
Latur
Saturday, March 1, 2025
Homeराष्ट्रीयनव्या वर्षात जगभरात निवडणुकांची धामधूम

नव्या वर्षात जगभरात निवडणुकांची धामधूम

भारतासह अमेरिका, पाकिस्तान, बांगलादेशात निवडणूक नवे वर्ष राजकीयदृष्ट्या महत्वाचे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आता जगभर नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरू आहे. त्यामुळे २०२४ हे वर्ष कसे असेल, याची उत्सुकता प्रत्येकालाच आहे. मात्र सगळ््या जगासाठी नवे वर्ष राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे ठरणार आहे. कारण भारतात नववर्षाच्या सुरुवातीलाच निवडणुकीची धामधूम सुरू होणार आहे. यासोबतच इतर देशांतदेखील नववर्षात निवडणुका होणार आहेत. त्यामुळे नवे वर्ष निवडणुकीच्या धामधुमीचे असेल. २०२४ मध्ये तब्बल ४ अब्ज लोकसंख्येला सार्वत्रिक निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे.

लोकसंख्येच्या निकषावर निम्म्यापेक्षा जास्त जगात नव्या वर्षात नवी सरकारे स्थापन होतील. अर्थात जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताच्या निवडणूक प्रक्रियेकडे जगाचे लक्ष असेल. अमेरिकेमध्येही पुढल्या वर्षअखेरीस अध्यक्षीय निवडणूक होणार आहे. तसेच पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांत ‘लोकशाही’चा उरूस भरेल. चीनचा दावा असलेला तैवान तसेच इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका, पोर्तुगाल, ऑस्ट्रिया या देशांतही २०२४ मध्ये निवडणूक होणार आहे. युरोपीय महासंघाच्या पार्लमेंटची निवडणूक जूनमध्ये होऊ घातली आहे. ब्रिटनमध्ये २०२५ च्या जानेवारीत मतदान होणार असले तरी पंतप्रधान ऋषी सुनक मुदतपूर्व निवडणुका घेऊ शकतात.

अमेरिका : बायडेन विरुद्ध ट्रम्प?
अमेरिकेमधील अध्यक्षीय निवडणुकीचे मतदान वर्षाच्या सर्वात शेवटी, नोव्हेंबरच्या पहिल्या मंगळवारी, ५ तारखेला होणार असले तरी त्याची प्रक्रिया जानेवारीमध्ये पक्षांतर्गत प्राथमिक फेरीपासूनच (प्रायमरीज) होईल. डेमोक्रॅटिक पक्षातून विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना दुस-या कार्यकाळासाठी संधी मिळण्याची शक्यता असली तरी खरी चुरस रिपब्लिकन पक्षात आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे प्रायमरीजमध्ये सध्या आघाडीवर आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ट्रम्प विरुद्ध बायडेन अशी लढत बघायला मिळण्याची शक्यता आहे.

पाकिस्तान, बांगलादेशातही लढत
२०२४ च्या सुरुवातीलाच ७ जानेवारी रोजी बांगलादेशमध्ये मतदान होणार आहे. शेख मुजिबुर रहेमान यांची कन्या आणि विद्यमान पंतप्रधान शेख हसिना यांचा ‘आवामी लीग’ आणि पहिल्या महिला पंतप्रधान खालेदा झिया यांच्या ‘बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी’ (बीएनपी) या दोन पक्षांमध्ये सरळ लढत असली तरी झिया नजरकैदेत असून त्यांच्या पक्षाचे अनेक नेते तुरुंगवास भोगत आहेत. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दुसरीकडे पाकिस्तानातही पीटीआय पक्षाचे नेते इम्रान खान तुरुंगात असले तरी त्यांचा पक्ष सत्ताधारी आघाडीला टक्कर देत आहे. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ पाकिस्तानात परतल्याने सत्ताधा-यांना अधिक बळ मिळाले आहे. पाकिस्तानात फेब्रुवारीत मतदान होणार आहे.

तैवानमध्येही लढत
तैवानमध्येही १३ जानेवारीला अध्यक्षीय निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. सत्ताधारी डेमोकॅ्रटिक प्रोग्रेसिव्ह पक्षाचे ली चिंग-ते आणि प्रमुख विरोधक कौमितांग पक्षाचे हू यू-ही यांच्यात मुख्य लढत आहे. चिंग-ते यांची भूमिका विद्यमान राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांच्या धोरणांशी सुसंगत आहे. तैवानचे सार्वभौमत्व आणि लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी ते मते मागत असून सद्य:स्थितीत आघाडीवर आहेत. यू-ही यांची भूमिका चीनशी चर्चेतून मार्ग काढावा अशी आहे तर निवडणुकीतील तिसरे उमेदवार को वेन-जे (तैवान पीपल्स पार्टी) चीनबरोबर समेट करण्याची भाषा करीत आहेत.

रशिया : निवडणुकीची केवळ औपचारिकता?
७८ वर्षीय व्लादिमिर पुतिन यांच्या तहहयात रशियाचे अध्यक्ष राहण्याच्या घोषणेला धक्का लागेल, अशी स्थिती नाही. १५ ते १७ मार्च या कालावधीत रशियामध्ये अध्यक्षीय निवडणुकीसाठी मतदान होणार असले तरी सध्यातरी पुतिन यांच्याखेरीज त्यांच्याच सत्ताधारी ऑल रशिया पीपल्स फ्रंट आघाडीतील अलेक्सी नेचेव्ह यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

युरोपीय महासंघ ‘उजवे वळण’ घेणार?
६ ते ९ जून दरम्यान युरोपीय महासंघाच्या पार्लामेंटसाठी मतदान होईल. महासंघातून ब्रिटन बाहेर पडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून युरोपमध्ये ताकदवान होत चाललेला ‘युरोपीयन कन्झर्व्हेटिव्हज अँड रिफॉर्मिस्ट’ हा अतिउजवा गट या निवडणुकीत अधिक प्रबळ होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महासंघाच्या या उजव्या वळणाचा परिणाम संघटनेचा कणा असलेल्या जर्मनी आणि फ्रान्स या देशांतील अंतर्गत राजकारणावरही होऊ शकतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR