सोलापूर : सध्या महाविद्यालये व शाळांना सुट्टी असल्याने गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. सोलापूर आगारांत प्रवाशांची गर्दी वाढल्याने एसटी गाड्यादेखील वाढविण्यात आल्या आहेत. बसस्थानकामध्ये खासगी वाहनांच्या एजंटांचा सुळसुळाट वाढल्याने स्टैंडच्या आगारात घुसून प्रवाशी पळवण्याचा प्रकार सुरू आहे. बसस्थानकाला रिक्षा, ट्रॅव्हल्सवाल्यांचा विळखा पडला आहे.
थेट एसटी आगारात दुचाकीवरून त्याचबरोबर खासगी वाहने बाजूला लावून प्रवाशांना गाडीतून उतरवून आपल्या खासगी वाहनात बसवत आहेत. एसटी प्रशासनाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतआहेत काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सोलापूर एसटी आगाराभोवती खासगी ट्रॅव्हल्स मोठ्याप्रमाणात आहेत. शिवाय रिक्षाचालकांची संख्याही जास्त आहे. सोलापूर येथे सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे वाहनचालकांना बसस्थानकात ये-जा करताना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर वाढती गर्दी पाहता प्रवाशांना खासगी गाडीने आण्यासाठी आगारात आवाज देऊन प्रवाशांनी खासगी खुलेआम ट्रॅव्हल्सकडे पळवले जात आहे. याकडे मात्र बसस्थानक प्रमुखांचे दुर्लक्ष होत आहे. सोलापूर मध्यवर्ती बसस्थानक येथून हजारो प्रवासी रोज ये-जा करीत असतात. त्यात पार्सल घेऊन जाणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे या परिसरात खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांची कार्यालये आहेत. यामुळे या मार्गावर वाहने उभी केली जातात, त्यात सायंकाळी याठिकाणी वाहनांच्या रांगा लागत असल्याने येथे नागरिकांना वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागत आहे.
शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सिग्नलची यंत्रणा आहे. मात्र, एसटी स्टँडच्या प्रवेशद्वाराजवळ अनेकदा खासगी प्रवासी वाहतुकीची वाहने प्रवाशांची चढ-उतार करण्यासाठी थांबविल्या जात आहेत. त्यामुळे सिग्रलवर थांबलेल्या वाहनांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो.
बसस्थानकापासून २०० मीटर अंतरावर प्रवासी वाहतुकीची अन्य वाहने थांबवू नयेत. तसेच त्यातून प्रवाशांची ने-आण करू नये, असा नियम आहे. मात्र, तो पायदळी तुडवून खासगी ट्रॅव्हल्सवाले प्रवासी वाहतूक करीत आहेत. रस्ता अरुंद असल्याने बसस्थानकाच्या प्रवेशद्वार येथे गाड्यांच्या रांगा लागतात. आरटीओच्या दुर्लक्षामुळे ट्रॅव्हल्स व्यावसायिकांचे फावले आहे. त्याचा परिणाम एसटीच्या प्रवासी वाहतुकीवर होत आहे.
सोलापूर एस टी स्टँड परिसरात गर्दी आणि वाहतूक कोंडीमुळे ज्येष्ठ नागरिक व लहान मुलाना घेऊन जाण्यास अडथळे येत आहेत. रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून स्टेशन चौकाकडे जातान रस्त्याच्या कडेला खासगी वाहने उभी असल्याने येथून जाताना त्रास सहन करावा लागत आहे.