मुंबई : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर येत असून या घटनांचे तीव्र पडसाद समाजात उमटत आहे. विरोधी पक्षांनी महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न देखील केला. या पार्श्वभूमीवर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) आकडेवारी तपासली असता तर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या काळातील दैनंदिन सरासरी घटनांची संख्या १२६ इतकीच असल्याचे लक्षात येते. सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२१ या कोविड लॉकडाऊन काळातसुद्धा महाराष्ट्रात प्रतिदिवशी १०९ महिला अत्याचाराच्या घटना घडत होत्या. विशेष म्हणजे जानेवारी ते जून २०२२ या काळात ज्या सरासरी १२६ घटना प्रतिदिवशी घडत होत्या, तितक्याच घटना म्हणजे प्रतिदिन १२६ इतकीच संख्या आजही आहे.
बदलापूरची घटना आणि त्यानंतर महाविकास आघाडीने केलेले आंदोलन, बहुतेक सर्व राजकीय नेत्यांच्या दररोज येणा-या प्रतिक्रिया यामुळे एकूणच जनमानस ढवळून निघाले आहे.
एनसीआरबीकडून मिळालेल्या आकडेवारीचे विश्लेषण केले असता असे लक्षात येते की, २०२० या लॉकडाऊनच्या वर्षांत महाराष्ट्रात ३१,७०१ महिलांवर अत्याचार झाले. त्याची सरासरी ८८ घटना प्रतिदिवशी इतकी होती. २०२१ हे सुद्धा लॉकडाऊनचेच वर्ष होते. या वर्षात महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटनांची संख्या अचानक ३९,२६६ वर पोहोचली. याची सरासरी १०९ घटना प्रतिदिवशी इतकी येते.
जानेवारी ते जून २०२२ या काळात महाविकास आघाडीच्या काळात एकूण २२,८४३ घटना महिला अत्याचाराच्या घडल्या. त्याची सरासरी १२६ घटना प्रतिदिवस इतकी आहे. ३० जून २०२२ रोजी महायुतीचे सरकार आले. जुलै ते डिसेंबर २०२२ या ६ महिन्यात २०,८३० घटना घडल्या. याची सरासरी ११६ घटना प्रतिदिवस इतकी येते. आता २०२३ मध्ये २०२२ इतक्याच घटना असून, त्याची सरासरी सुद्धा १२६ घटना प्रतिदिवस इतकी येते. याचाच अर्थ कोविड काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जी सरासरी होती, तितक्याच घटना आज महाराष्ट्रात होत आहेत. एकूणच महिला अत्याचाराच्या घटनांची मविआच्या काळाइतकीच संख्या आजही दिसून येते.
यातही अल्पवयीन मुलींवरचे अत्याचाराचे प्रयत्न (पॉक्सो कलम १२, भादंवि ५०९) या श्रेणीतील गुन्हे पाहिले तर त्यात अचानकच २०२१ पासून मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. हे गुन्हे २०१७ मध्ये ९४, २०१८ मध्ये ४८, २०१९ मध्ये ९४, २०२० मध्ये ४८ इतके होते. ते २०२१ पासून अचानक वाढले आणि ती संख्या २४९ वर पोहोचली. २०२२ मध्ये ही संख्या ३३२ इतकी आहे. यातील जून २०२२ पर्यंत राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडी सरकार होते आणि अनिल देशमुख हे गृहमंत्री होते.
एकिकडे हा कल दिसत असताना १८ वर्षांपेक्षा वरील मुलींच्या बाबतीत विनयभंगाच्या गुन्ह्यांची संख्या ही कमी झालेली दिसून येते. २०२२ मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात १३१७ गुन्हे नोंदले होते, ते २०२३ मध्ये १२०८ इतके नोंदले गेले. महिलांवरील भादंवि ३५४ च्या गुन्ह्यांमध्ये साधारणत: ७०० ते ९०० इतक्या संख्येने दरवर्षी वाढ होते. पण, असे असताना काही श्रेणीतील गुन्ह्यांमध्ये घट होताना सुद्धा दिसून येते. महिलांशी संबंधित सायबर गुन्ह्यांची संख्या जी २०२२ मध्ये ११६ वर गेली होती, ती २०२३ मध्ये ७९ वर आली आहे.
मुंबईच्या बाबतीत विचार केला तर पॉक्सोच्या अंतर्गत कलम ४ आणि ६ अंतर्गत बलात्काराचे नोंदले गेलेले गुन्हे कमी झालेले आहेत. लॉकडाऊनच्या काळात सुद्धा मुंबईत २०२० मध्ये ४४५ बलात्कार झाले. २०२१ या लॉकडाऊनच्याच वर्षी ५२४ बलात्कार अल्पवयीन मुलींवर झाले. २०२२ मध्ये ही संख्या ६१५ वर गेली, तर २०२३ मध्ये ती कमी होऊन ५९० वर आली.
वर्ष- महिला अत्याचाराच्या घटना- सरासरी/प्रतिदिन
जानेवारी ते जून २०२२- २२,८४३ – १२६ घटना
जुलै ते डिसेंबर २०२२ – २०,८३० – ११६ घटना
२०२३ – ४५,४३४ – १२६ घटना