24.3 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeपरभणीपरभणी बसपोर्टच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण

परभणी बसपोर्टच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण

परभणी/प्रतिनिधी
परभणी शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील प्रवाशांचे लक्ष लागलेल्या बहुप्रतिक्षित आणि परभणी शहराच्या वैभवात भर टाकणा-या बसपोर्टच्या पहिल्या टप्प्यातील कामाचा लोकार्पण सोहळा शिवसेना ठाकरे गटाचे आ. डॉ. राहुल पाटील यांच्या हस्ते मंगळवार, दि.१५ ऑक्टोबर रोजी पार पडला.
परभणी शहरातील जुन्या बस स्थानकाची अवस्था बिकट झाल्यामुळे आ. डॉ. पाटील यांनी पाठपुरावा करत तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या माध्यमातून परभणीत बसपोर्टला मंजुरी मिळवली होती.

सातत्याने पाठपुरावा करत बस पोर्टचे काम सुरू केले. १३ कोटी ४८ लाख रुपयांच्या निधीतून बसपोर्टचे काम पूर्णत्वाला गेले आहे. आता केवळ इलेक्ट्रिकल आणि सौंदर्यकरणाची कामे प्रगतीपथावर आहेत. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारे मध्यवर्ती बस स्थानक म्हणून परभणीच्या बसस्थानकाची ओळख आहे. त्यामुळे परभणी येथे आ. पाटील यांनी पूर्वीच्या बस स्थानकाच्या जागेवर बस पोर्ट उभारले. अनेक अडचणी आणि अडथळ्यांवर मात करत अत्याधुनिक बसपोर्ट उभे राहिले आहे.

तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता मंजुरी पूर्ण झाल्यावर न्यायालयीन प्रक्रियेसह अन्य बाबींमध्ये वेळ गेला. त्यासोबतच कोरोना काळात अडीच वर्षाचा कालावधी गेला त्यामुळे काम रखडले होते. महायुती सरकारने निधी रोखल्यामुळे पहिल्या टप्प्यातील कामास विलंब झाला. त्यानंतर आ. पाटील यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करून निधीला मंजुरी मिळवली आणि काम पूर्ण करून घेतले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करत निधी मिळवला. या बस पोर्टचे काम पूर्ण झाल्यामुळे परभणीच्या वैभवात भर पडली आहे.

आ.पाटील यांनी मंगळवारी बस पोर्टचे लोकार्पण केले. यावेळी विभाग नियंत्रक सचिन डफळे, डॉ. विवेक नावंदर, आगार प्रमुख काळम पाटील, संजय गाडगे, सदाशिव देशमुख, अनिल डहाळे, अरविंद देशमुख, अर्जुन सामाले, दिनेश बोबडे, संदिप झाडे, सुभाष जोंधळे, बंडुनाना बिडकर, विशु डहाळे, बाळराजे तळेकर, संभानाथ काळे आदीसह शिवसेना, युवासेना, दलित आघाडी पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बसपोर्टच्या दुस-या टप्प्यात चित्रपटगृह, मॉल उभारणार
मराठी चित्रपटाला प्रोत्साहन देण्यासाठी परभणी शहरातील बस पोर्ट कामाच्या दुस-या टप्प्यात या ठिकाणी चित्रपटगृह उभारण्यात येणार आहे. तसेच नागरीकांना याच ठिकाणी विविध वस्तुंची खरेदी करता यावी या दृष्टीकोनातून मेट्रो शहराच्या धर्तीवर मॉलची येथे उभारणी करण्यात येणार आहे. बसपोर्ट परीसरात प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्यात येतील असे आ. डॉ. पाटील यांनी बस पोर्ट कामाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR