अहिल्यानगर : प्रतिनिधी
राज्यात सर्वत्र निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यातील मुळा सहकारी साखर कारखान्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शंकरराव गडाखांच्या साखर कारखान्याला आयकर खात्याने नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये कारखान्याला १३७ कोटी रुपये भरण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर ही नोटीस आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
अहिल्यानगरच्या सोनई येथील मुळा सहकारी साखर कारखाना हा माजी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या अधिपत्याखाली येतो.
शंकरराव गडाख यांनी नुकताच शिवसेना उध्दव ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गडाख यांच्यावर दबाव टाकण्याचा या प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, केवळ एकाच कारखान्याला नोटीस देण्यात आल्याने अनेक चर्चा सध्या परिसरात रंगू लागल्या आहेत. तर यामागे राजकरण असल्याचा गडाख यांनी आरोप केला आहे. परिणामी, याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही शंकरराव गडाख म्हणाले आहे. या कारवाई विरोधात उद्या शंकरराव गडाख कार्यकर्ता मेळावा घेणार असल्याचीही माहिती पुढे आली आहे. तर यापूर्वी सुद्धा संस्था अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला असल्याचेही ते म्हणालेय. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शंकरराव गडाखांच्या साखर कारखान्याला आयकर खात्याची नोटीस आल्याने जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.