नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचा-यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं शुक्रवारी सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात २ टक्क्यांच्या वाढीला मंजुरी दिली. या दुरुस्तीमुळे डीए ५३% वरून ५५% होईल. ही वाढ सातव्या वेतन आयोगाअंतर्गत झाली आहे. सरकारने आठवा वेतन आयोगही स्थापन केला आहे. नवीन वेतन आयोगाच्या शिफारशी जानेवारी २०२६ पासून लागू होण्याची शक्यता आहे.
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार केंद्रीय कर्मचा-यांच्या भत्त्यांमध्ये वर्षातून दोनवेळा वाढ केली जाते. ही वाढ सहामाही तत्त्वावर होते. यापूर्वी जुलै २०२४ मध्ये महागाई भत्ता ५० टक्क्यांवरून ५३ टक्के करण्यात आला होता. यात ३ टक्के वाढ झाली होती. आता नव्या निर्णयानुसार भत्त्यात २ टक्के वाढ करण्यात आली आहे. ही वाढ जानेवारी २०२५ ते जून २०२५ पर्यंत आहे.
दोन महिन्यांची थकबाकी मिळणार
सरकारने मार्च महिन्यात भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली आहे. मात्र, केंद्रीय कर्मचा-यांना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे भत्तेही थकबाकी म्हणून मिळणार आहेत. नव्या वाढीनंतर केंद्रीय कर्मचा-यांच्या पगारात किती वाढ होईल, हे गणितावरून समजून घेऊया. जर केंद्रीय कर्मचा-याचे मूळ वेतन १९,००० रुपये असेल तर त्या कर्मचा-याला १०,०७० रुपये महागाई भत्ता मिळत बोका. आता २ टक्के वाढीनंतर हा भत्ता १०,४५० रुपये होईल. त्यामुळे केंद्रीय कर्मचा-यांच्या भत्त्यात ३८० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.