सोलापूर : पतीसह सासरच्या छळाला कंटाळून मागील ११ महिन्यांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील एक हजार ५५७ महिलांनी सासरच्यांविरुद्ध पोलिसांत धाव घेतली आहे. त्यात सोलापूर शहरातील ११७० तर ग्रामीणमधील ३८७ महिलांचा समावेश आहे.
पण, त्यापैकी एक हजारांवर महिलांचे तुटू लागलेले संसार पोलिसांनी समुपदेशनातून पुन्हा जोडले. पोलिसांत दाखल बहुतेक विवाहितांच्या तक्रारींमध्ये सासरच्यांनी घर बांधायला किंवा घर घ्यायला, नवीन गाडी घ्यायला, कर्ज फेडायला, व्यवसाय टाकायला, अशा कारणांसाठी माहेरहून पैसे आण म्हणून छळ केल्याचेच नमूद आहे. विवाहात दागिने दिले नाहीत, महागड्या वस्तू दिल्या नाहीत अशा कारणांसाठी देखील विवाहितांचा छळ सुरु असल्याचे पोलिसांत दाखल प्रकरणांवरुन दिसून येते. याशिवाय माहेरील लोक सतत मुलीला काहीही ना सांगतात आणि त्यांचे ऐकून विवाहिता सासरी वावरते. त्या रागातून सासरच्यांकडून विवाहितेला घालून पाडून बोलले जाते किंवा अनेकदा पतीसोबत भांडणे होतात.
दुसरीकडे सासरकडील लोक विशेषत: विवाहितेची नणंद, सासू तिच्या पतीच्या मनात काहीतरी भरवतात आणि त्यातून विवाहितेचा छळ केला जातो, अशीही उदाहरणे खूप आहेत. तसेच वंशाला दिवा म्हणून मुलगा झाला किंवा होत नाही आणि सतत फोनवरच बोलत राहते, अशा संशयातूनही विवाहितेचा छळ केला जात असल्याचे पोलिसांतील तक्रारीतून दिसून येते. गंभीर बाब म्हणजे विवाहापूर्वी सात जन्मांच्या शपथा घेणारे अनेकजण विभक्त होण्यासाठी म्हणजेच घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात धाव घेत आहेत.
हुंडा प्रतिबंधक कायदा १९६१नुसार लग्नावेळी मुलाकडून (वर) किंवा मुलीकडून (वधू) विरुद्ध बाजूच्या कुटुंबाला देण्यात येणारी पैसे, मालमत्ता किंवा वस्तू- सोने स्वरूपातील भेट म्हणजे हुंडा मानला जातो. पण, या कायद्याचा धाक दिसून येत नाही. आजही सोने, महागड्या वस्तू, वाहने, पैसे अशा स्वरूपात हुंडा घेतलाच जातो. पोलिसांत दाखल तक्रारींवरून हे स्पष्ट होते.
सोलापूर शहरातून प्रत्येक महिन्याला सरासरी १३० ते १५० विवाहिता सासरच्या त्रासाला कंटाळून अन्यायाविरुद्ध न्याय मागण्यासाठी पोलिसांत धाव घेतात. त्यावेळी त्यांना पोलिस आयुक्तालयातील भरोसा सेलमध्ये (महिला सुरक्षा कक्ष) पाठविले जाते. त्याठिकाणी त्यांचे समुपदेशन केले जाते आणि तुटण्याच्या उंबरठ्यावरील संसार पुन्हा जोडण्याचा प्रयत्न केला जातो. पण, सध्या लग्नसराई असल्याने आमच्या कार्यालयातील बहुतेकजण रजेवर गेल्याची माहिती सोलापूर शहर पोलिसांच्या भरोसा सेलमधील एका अंमलदाराने दिली. आता त्या कार्यालयातील अनेकजण रजेवर असतील तर सासरचा त्रास आणि माहेरी न जाणाऱ्या विवाहितांनी या काळात जायचे-रहायचे कोठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकाच कार्यालयातील अनेकजण रजेवर असतील, तर पर्यायी मनुष्यबळ उपलब्ध करून द्यायला हवे, अशी अपेक्षा आहे.