पुणे : वारंवार खोकला येणे, घसा खवखवणे, सर्दीमुळे नाक बंद होणे किंवा वांरवार शिंका येणे यांपैकी किमान एक लक्षण सध्या शहरातील बहुसंख्य कुटुंबातील एक ते दोन व्यक्तींमध्ये दिसून येत आहे. वातावरणातील बदलांमुळे शहरात सध्या सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. मात्र, सध्या आढळून येणारे रुग्ण तापातून लवकर बरे होत आहेत. मात्र, खोकला बरा होण्यासाठी काही रुग्णांना १५ दिवस ते एक महिना वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे ‘पुणेकरांचा खोकला जाता जाईना,’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.
शहरात गेल्या काही दिवसांत विषाणूजन्य आणि संसर्गजन्य आजारांत वाढ झाल्याने या प्रकारचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. सध्या आढळून येणा-या सर्वाधिक रुग्णांत कोरडा खोकला आहे. १८ ते ४५ या वयोगटांतील नागरिकांना या प्रकारचा त्रास होत आहे. थंडीच्या दिवसांत हवा प्रदूषणाचे प्रमाण जास्त असते.
त्यामुळे प्रवास करताना मास्कचा वापर करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
ऑक्टोबरपासून वातावरणात सातत्याने चढउतार होत आहेत. सकाळी थंडी, दुपारी ऊन आणि रात्री पुन्हा थंडी असे वातावरण असल्याने तापाचे रुग्ण वाढले आहेत. अशा वातावरणात विषाणूचा संसर्ग होण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. ताप चार ते पाच दिवसांत बरा होतो; परंतु उपचारांचा कालावधी पूर्ण न करणे, स्वत:च्या मनाने औषधे घेणे, उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे या कारणांमुळे काही रुग्णांचा खोकला बरा होण्यास वेळ लागतो.