मुंबई : कोकणातील राजकीय वातावरण तापले आहे. राणे आणि ठाकरे समर्थकांमध्ये चिपळूणमध्ये शुक्रवारी राडा झाला. आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यलयाबाहेर राणे समर्थक आणि ठाकरे समर्थक भिडले होते. या घटनेचे पडसाद सिंधुदुर्गात उमटू नयेत म्हणून पोलिसांकडून चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या सुरक्षेत पोलिसांनी वाढ केली आहे. कार्यालय आणि घराबाहेर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. राणे ज्या पध्दतीने उत्तर देतील त्याच पध्दतीने उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया वैभव नाईक यांनी दिली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस कोकणातील राजकीय वातावरणाकडे राज्याचे लक्ष असेल.
रत्नागिरीतील गुहागरमध्ये झालेल्या शुक्रवारच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचा पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. वैभव नाईक यांच्या कार्यालयाबाहेर आणि घराबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गुहागरमधील भास्कर जाधव आणि निलेश राणे यांच्या कालच्या घटनेचे पडसाद सिंधुदुर्गात उमटू नयेत, म्हणून पोलिसांनी खबरदारी घेऊन नाईक यांच्या घराबाहेर आणि कार्यालयाबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या कणकवलीतील सभेनंतर जे वातावरण निर्माण झाले होते, त्या अनुषंगाने पोलिसांनी वैभव नाईक यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.
जशास तसे उत्तर देऊ – वैभव नाईकांचा हल्लाबोल
शुक्रवारच्या घटनेमुळे पोलिस बंदोबस्त वाढवला असेल मात्र त्याची गरज नाही. शिवसैनिक जिल्ह्यातील दहशत मोडण्यासाठी समर्थ आहेत. राणे ज्या पध्दतीने उत्तर देतील त्याच पध्दतीने उत्तर देऊ, अशी प्रतिक्रिया आमदार वैभव नाईकांनी दिली आहे. नारायण राणेंना जसे उद्धव ठाकरेवर टीका करण्यासाठी भाजपने ठेवले आहे, तसेच भास्कर जाधवांवर टीका करण्यासाठी निलेश राणेंना भाजपने सोडलेले हे पिल्लू आहे. भाजपचा सुसंस्कृतपणा यातून समोर येत आहे. अशा लोकांमुळे भाजप यापुढच्या काळात रसातळाला जाईल, अशी टीका वैभव नाईक यांनी केली.