मुंबई : प्रतिनिधी
राज्यात सध्या ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे मराठवाडा वगळता ब-याच भागातील धरणांमधील पाणीपातळी वाढत आहे. काही धरणांमधून तर विसर्ग करण्यात येत आहे. मात्र, मराठवाड्यासह राज्यातील अनेक धरणांना अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे पिके तरारली. परंतु अजूनही म्हणावा तसा मोठा पाऊस झालेला नाही. त्यामुळे प्रकल्पांत अद्याप पाणीवाढ झालेली नाही.
जलसंपदा विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील एकूण धरणांमध्ये आता ३६.०७ टक्के उपयुक्त धरणसाठा आहे. यात छत्रपती संभाजीनगर विभागात केवळ १५.२६ टक्के पाणीसाठा शिल्लक असून राज्यातील इतर विभागांच्या तुलनेत हा सर्वात कमी धरणसाठा आहे. मराठवाड्यातील ब-याच भागात पाऊस कोसळतोय. परंतु पावसाचा म्हणावा तसा जोर दिसत नाही. त्यामुळे पिके तरारली असली तरी प्रकल्पांच्या पाणीपातळीत अद्याप वाढ होताना दिसत नाही. त्यामुळे मराठवाड्यातील प्रकल्प तळालाच आहेत.
दरम्यान, कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे भातसा धरणासह सूर्या धामणी व अप्पर वैतरणा धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली असून कोकणातील धरणे ५० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहेत. पुण्यातही मागील काही दिवसांपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे बहुतांश धरणांमधील पाणीसाठा वाढत आहे. कोल्हापूर, सांगली, साता-यातील प्रमुख धरणेही आता ५० टक्क्यांच्या वर पोहोचली असून वारणा ६०.५३, राधानगरी ७०.५९ तर कोयना ४५.५८ टक्क्यांवर आहे. पुण्यातही खडकवासला ७०.२४, पानशेत ५१.३७ टक्क्यांवर पोहोचले आहे.
विदर्भातही यंदा मागील काही दिवसांत झालेल्या पावसामुळे धरणसाठा वेगाने वाढत असून बहुतांश धरणांमध्ये पाणीसाठा ५० टक्क्यांपर्यंत वाढला आहे. अमरावती विभागात ऊर्ध्व वर्धा धरण ४७ टक्के तर बेंबळा ४५ टक्के भरले आहे. काटेपूर्णा ३०.५७ तर खडकपूर्णा शुन्यावर आहे. निम्न वर्धात ५३.९५ टक्के पाणीसाठा आहे. गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला धरण तुडुंब भरले असून, ८ दरवाजातून विसर्गही सोडण्यात आला आहे. नाशिक विभागातील बहुतांश धरणांमध्ये पाणीसाठ्यात वाढ होत असून सर्वाधिक धरणे असणा-या या विभागातील धरण परिसरात जोरदार पाऊस झाल्याने पाणीसाठा वाढत आहे. दारणा ४९.९५ टक्के, भंडारदरा ४४.९०, गिरणा ६१.४८ टक्के, वाघूर ६३.२८ टक्के पाणीसाठा आहे.
मराठवाड्यात पाण्याची प्रतीक्षाच
मराठवाड्यात पावसाळ््याच्या सुरुवातीपासून पाऊस हजेरी लावत आहे. परंतु प्रत्यक्षात तुरळक ठिकाणी पावसाचा जोर आहे. ब-याच भागात हलका ते मध्यम स्वरूपाच्याच सरी कोसळत असल्याने खरीप पिके तरारल्याचे चित्र आहे. परंतु प्रकल्पांतील पाणी वाढताना दिसत नाही. हळूहळू पाणी वाढत आहे. जायकवाडीचा पाणीसाठआ तर ५ टक्क्यांच्या वर न गेल्याने पाणीटंचाईचे संकट अजूनही भेडसावत आहे. मराठवाड्यातील जायकवाडीत ४.१३ टक्के, निम्न दुधनात ६.२७ टक्के, येलदरी ३०.०९ टक्के, माजलगाव शून्य, मांजरातही शून्य, उर्ध्व पैनगंगेत ३९.५५ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे, तर तेरणा प्रकल्पांत २३.४५ टक्के पाणीसाठा आहे. परंतु या पाणीसाठ्यात म्हणावी तशी वाढ होताना दिसत नाही.