मुंबई : विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. त्यातच विधान परिषदेच्या ११ जागांसाठी मतदार झाले. अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. यानंतर या योजनेची नोंदणी करण्यासाठी ठिकठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळाली. या योजनेच्या अंमलबजावणीवरून विरोधक सत्ताधा-यांवर टीका करताना पाहायला मिळत आहेत. लाडकी बहीण योजनेवरून विधानसभेत भाजपा आमदार राम कदम आणि काँग्रेस आमदार नाना पटोले यांच्यात खडाजंगी झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेचा अर्ज करण्यासाठी जे ऍप आणि वेबसाइट आहे, ते सतत बंद पडत असल्याने जनतेला त्रास होतो आहे असे सांगत नाना पटोले यांनी महायुती सरकारवर टीका केली. या टीकेला राम कदम यांनी उत्तर दिले. गोरगरीब महिलांना या योजनेतून दोन पैसे मिळालेले तुम्हाला बघवत नाही. महाविकास आघाडीला केवळ चांगल्या योजनांचे राजकारण करायचे आहे. गरीब महिलांना पैसे मिळत असतील तर तुमच्या पोटात काय दुखते? नाना पटोले यांना या योजनेची माहिती नाही. संपूर्ण महाराष्ट्रात ही योजना फसली पाहिजे, असा विरोधकांचा प्रयत्न आहे, या शब्दांत राम कदम यांनी नाना पटोलेंच्या टीकेचा समाचार घेतला.
सत्ताधा-यांना राजकारण करायचे आहे
राम कदम यांना उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, लाडकी बहीण योजनेला आमचा कोणताही विरोध नाही. सरकारने काय करायचे हा त्यांचा प्रश्न आहे. या योजनेचा अर्ज करण्यासाठी जे ऍप आणि वेबसाइट आहे. त्यांचा प्रॉब्लेम सुरु आहे. त्यामुळे तहसीलमध्ये रांगा लागल्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांनाही याचा त्रास होतो आहे. त्यांना जात प्रमाणपत्रे आणि इतर कागदपत्रे मिळत नाही. म्हणून लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित केला, मात्र, सत्ताधा-यांना याचे केवळ राजकारण करायचे आहे, असे प्रत्युत्तर नाना पटोले यांनी दिले.
राम कदमही आक्रमक
नाना पटोले यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली. नाना पटोले यांना वस्तूस्थिती माहिती नाही. घाटकोपर मतदारसंघात एका घरात तीन बहिणी आहेत. त्यांना दर महिन्याला साडेसात हजार रुपये मिळणार आहेत. काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जाऊन त्यांचा चुकीचे अर्ज भरत आहेत. १५ ऑगस्टला आमच्या बहिणींच्या खात्यात हे पैसे जाऊ नये, असा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे, असा दावाही राम कदम यांनी केला.