28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रअपक्ष, मुस्लीम मतांचे सर्वाधिक विभाजन होण्याची शक्यता

अपक्ष, मुस्लीम मतांचे सर्वाधिक विभाजन होण्याची शक्यता

मुंबई : विशेष प्रतिनिधी
राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांत एकूण ४,१३६ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात असून त्यामध्ये मुस्लीम उमेदवारांची संख्या ४२० आहे. यामध्ये अपक्ष व नोंदणीकृत पक्षांच्या उमेदवारांची संख्या मोठी असून महाविकास आघाडीने ११ तर महायुतीने ६ मुस्लिमांना उमेदवारी दिली आहे. यंदा बहुजन समाज पक्षाकडून सर्वाधिक २३७ उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.

यंदाच्या निवडणुकीत मुस्लीम मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याशिवाय पाच पक्षांनी १०० हून अधिक उमेदवार निवडणुकीत उतरवले आहेत. यात भाजप, बहुजन समाज पक्ष, अखिल भारतीय काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षांचा समावेश आहे.

निवडणूक आयोगाने आगामी विधानसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. या आकडेवारीनुसार, यंदा २,८०६ अपक्ष उमेदवारांनी २८०६ अर्ज दाखल केले. या यादीत एकूण १५८ राजकीय पक्षांचा समावेश आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मुस्लीम संघटनांनी महाविकास आघाडीकडे मुस्लिमांना १० टक्के उमेदवारी देण्याची मागणी केली होती. प्रत्यक्षात काँग्रेसने ८, राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार) २ आणि शिवसेनेने (उद्धव ठाकरे) १ असे एकूण ११ (४ टक्के) उमेदवार दिले. महायुतीमध्ये शिवसेनेने (एकनाथ शिंदे) १ आणि राष्ट्रवादीने (अजित पवार) ५ असे अवघे सहा (२ टक्के) मुस्लीम उमेदवार दिले आहेत. भाजपने नेहमीप्रमाणे एकही मुस्लीम उमेदवार दिलेला नाही.

वंचित बहुजन आघाडी २०० जागा लढवत असून २३ मुस्लीम उमेदवार उभे केले आहेत. ‘एमआयएम’ने १७ पैकी १० तर समाजवादी पक्षाने ९ पैकी ७ मुस्लीम उमेदवार दिले आहेत. नोंदणीकृत राजकीय पक्षांचे १५० आणि अपक्ष २१८ मुस्लीम उमेदवार विधानसभेच्या मैदानात आहेत. त्यामध्ये ८ महिला उमेदवारांचा समावेश आहे. ‘औरंगाबाद पूर्व मतदारसंघात सर्वाधिक १७ तर ‘मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात सर्वच्या सर्व १३ उमेदवार मुस्लीम आहेत. मुदत संपलेल्या विधानसभेत १० मुस्लीम आमदार होते. विधान परिषदेत राष्ट्रवादीचे (अजित पवार) इद्रीस नायकवडी हे एकमेव मुस्लीम आमदार आहेत.

यंदा निवडणुकीच्या रिंगणात तब्बल २,८०६ उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत. इतर पक्षांच्या तुलनेत ही संख्या जास्त आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR