नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांमधील वाद वाढत चालला आहे. विरोधी पक्षांनी जगदीप धनखड यांना पदावरून हटवण्याचा प्रस्ताव आणण्याची तयारी केली आहे. हा प्रस्ताव औपचारिकपणे आल्यास संसदेच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्ष उपराष्ट्रपतींना हटवण्यासाठी पुढाकार घेतील. राज्यसभेत सपा खासदार जया अमिताभ बच्चन आणि जगदीप धनखड यांच्यातील वादानंतर राज्यसभेत चांगलेच वातावरण तापले. उपराष्ट्रपतींना हटवण्याच्या प्रस्तावावर राज्यसभेच्या ८७ सदस्यांनी घाईघाईने स्वाक्षरी केली.
काँग्रेसच्या राज्यसभा सदस्यांच्या म्हणण्यानुसार प्रस्तावावर काँग्रेसच्या ४-५ सदस्यांनी स्वाक्षरी केलेली नाही. इंडिया आघाडीचे राज्यसभेत ८७ सदस्य आहेत. बाहेरील सदस्यांनीही सह्या केल्या असण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी सभागृह नेते जेपी नड्डा यांनाही विरोधी पक्ष धनखड यांना हटवण्याचा प्रस्ताव आणण्याच्या विचारात आहे, असे सांगितले होते.
इंडिया आघाडीच्या माहितीनुसार नोटीसद्वारे ते अध्यक्षांच्या पक्षपाती वृत्तीवर प्रकाश टाकणार आहेत. हा प्रस्ताव कधी मांडला जाणार हे अद्याप ठरलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता स्वाक्ष-यांची प्रक्रिया वाढविण्यात येणार आहे. रीतसर सादर करण्यासाठी दोनच सह्या पुरेशा असल्या तरी विरोधकांना आपली पूर्ण ताकद दाखवायची आहे. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यांना हटवण्यासाठी राज्यसभेत बहुमताने ठराव मंजूर करावा लागेल. प्रस्ताव आणण्याच्या १४ दिवस आधी नोटीसही द्यावी लागेल.
इंडिया आघाडीकडे एकूण ८७ सदस्य
राज्यसभेत सध्या २२५ सदस्य आहेत. एनडीएकडे भाजपच्या ८६ सदस्यांसह १०१ खासदार आहेत. इंडिया आघाडीकडे ८७ सदस्य आहेत. अशा परिस्थितीत वायएसआरसीपीचे ११ सदस्य, बीजेडीचे ८ आणि अण्णाद्रमुकचे ४ सदस्यांसह २३ सदस्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मात्र, ३ सप्टेंबरला राज्यसभेच्या १२ जागांसाठी निवडणुका आहेत. यातील भाजपला किमान १० जागा मिळू शकतात.