18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeक्रीडाभारताने पाकला नमविले

भारताने पाकला नमविले

नवी दिल्ली : भारतीय संघाने ट्वेंटी-२० एमर्जिंग टीम आशिया कप २०२४ स्पर्धेत विजयी सलामी दिली. भारताने अटीतटीच्या लढतीत पाकिस्तानला पराभवाची चव चाखवली. ७ धावांनी विजय मिळवून भारताने स्पर्धेची दणक्यात सुरुवात केली. तिलक वर्माच्या नेतृत्वाखाली खेळणा-या भारत ‘अ’ संघाने पाकिस्तान शाहिन्स संघाला धुतले.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय सालामीवीर अभिषेक शर्मा व प्रभ सिमरन सिंग यांनी पहिल्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली. सातव्या षटकात अभिषेक शर्मा (३५) झेलबाद झाला. प्रभसिमरन सिंग(३६) देखील माघारी परतला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या तिलक वर्माने फटकेबाजी सुरूच ठेवली. त्याला नेहाल वढेराची साथ मिळाली आणि १२ व्या षटकात भारताची धावसंख्या १०० पार पोहोचवली. १४ व्या षटकांत वधेरा (२५) बाद झाला, तर आयुष बदोनी (२) धावा करू शकला.

१९ व्या षटकातील पहिल्या चेंडूवर कर्णधार तिलक (४४) बाद झाला आणि भारताच्या खेळीला ब्रेक लागला. त्यानंतरच्या फलंदाजांना फारशी चांगली कामगीरी करता आली नाही. भारताने २० षटकांत १८३ धावा धावफलकावर लावल्या. भारताच्या १८३ धावांचा पाठलाग करण्यास उतरलेल्या पाकिस्तानने पहिल्याच षटकात विकेट गमवली. अंशुल कंबोजने पाकिस्तानी कर्णधार मोहम्मद हॅरीसला त्रिफळाचीत केले. यासिर खानने पाकिस्तानची एक बाजू लावून धरली, परंतु दुस-या बाजूने विकेट पडत होत्या. यासिर व कासिम अक्रमच्या जोडीने ५४ धावांची भागीदारी केली. पण, ९ व्या षटकात यासिरला (३३) रमनदीप सिंग सुंदर एकहाती झेल करत बाद केले. त्याच षटकात कासिमही (२७) बाद झाला.

५ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या अरफत म्हिनासने पाकिस्तानचा डाव सावरण्यास सुरूवात केली. त्याला अब्दुल समदची साथ मिळली. पण, रसिख सलामने अरफत म्हिनासला बाद केले. १९ व्या षटकातील पहिल्या चेंडूवर कंबोजने अब्दुलला बाद केले आणि सामना भारताच्या बाजूने फिरला. भारताने अवघ्या ७ धावांनी स्पर्धेतील पहिला सामना आपल्या नावे केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR