25.7 C
Latur
Friday, February 28, 2025
Homeराष्ट्रीय‘इंडिया’ पुन्हा एकवटली

‘इंडिया’ पुन्हा एकवटली

देशपातळीवर मोदींना शह देण्यासाठी सज्ज जागा वाटपावर होणार निर्णय?

नवी दिल्ली : तब्बल साडेतीन महिन्यांनंतर येत्या मंगळवार दि. १८ डिसेंबर रोजी होणारी ‘इंडिया’ आघाडीची बैठक कितपत यशस्वी ठरणार यावर आघाडीचे भवितव्य ठरणार आहे. या बैठकीत सर्वात कठीण असलेले जागा वाटपाचे सूत्र व सर्वपक्षीय सभांचा कार्यक्रम ठरविणे आहे. या दोन मुद्यांवर प्रामुख्याने चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पाटणा, बंगळूरू व मुंबईतील बैठकांनंतर इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठकच झाली नाही. या दरम्यान साडेतीन महिने लोटले आहेत. विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर काँग्रेसने पुढाकार घेऊन आता येत्या १९ डिसेंबरला इंडिया आघाडीतील २८ पक्षांच्या नेत्यांची बैठक आयोजित केली आहे. बहुतेक नेत्यांनी सध्यातरी येण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु वेळेवर नेमके किती नेते उपस्थित राहतात. यावरच या बैठकीचे यश स्पष्ट होणार आहे. काँग्रेसच्या एकूणच भूमिकेबद्दल या आघाडीतील इतर नेत्यांमध्ये तेवढाचा विश्वास नाही.

येत्या मंगळवारी होणा-या या बैठकीत प्रामुख्याने दोन मुद्यांवर चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा तिढा सोडविणे अत्यंत आवश्यक आहे. प्रामुख्याने उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली व पंजाब या राज्यांमध्ये जागावाटपाची समस्या आघाडीच्या घटकपक्षांमध्ये आहे. उत्तरप्रदेश वगळता इतर तिन्ही राज्यांमध्ये घटक पक्षांची राज्ये सरकारे आहेत. यात काँग्रेसची भूमिका दुय्यम आहे. उत्तरप्रदेशातही काँग्रेसला दुय्यम भूमिका घ्यावी लागणार आहे. या चार राज्यांच्या जागा वाटपावर आघाडीची नाव मार्गी लागणार आहे.

मुंबईतील बैठकीत सर्वपक्षीय बैठक घेण्याचे निश्चित झाले होते. परंतु काँग्रेसचे नेते कमलनाथ यांच्या नकारामुळे भोपाळ येथे आयोजित ही सभाच रद्द झाली. त्यानंतर आघाडीला मुहूर्त मिळू शकला नाही. ही बैठक कुठे होणार यावर या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. जागा वाटपाचा तिढा एवढ्यात सुटणार नाही परंतु विरोधकांच्या जाहीरसभेची तारीख व स्थळ ठरणार असल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्र, बिहारचे जागावाटपाचे सूत्र ठरले
महाराष्ट्र व बिहारमध्ये आघाडीला जागावाटप करावे लागणार आहे. या दोन्ही राज्यांमध्ये घटकपक्षात जवळपास एकमत झाल्याचे सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घटकपक्ष आहेत. या घटकपक्षांच्या नेत्यांच्या यासंदर्भात चर्चा झाल्या आहेत. यात एकमत झाल्याचे समजते. तसेच बिहारमध्येही जेडीयू, आरजेडी व काँग्रेसमध्ये आघाडी आहे. या राज्यातही या तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

केजरीवाल अनुपस्थित राहणार?
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल येत्या मंगळवारी होणा-या आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता नाही. मुख्यमंत्री केजरीवाल येत्या १९ डिसेंबरपासून दहा दिवसांच्या विपश्यना शिबिरात सहभागी होणार आहेत. यामुळे ते या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR