पॅरिस : भारत आणि ग्रेट ब्रिटन यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताने विजय मिळवला आणि सेमीफायनलमध्ये सलग दुस-यांदा प्रवेश केला. प्रमुख डिफेंडर अमित रोहिदास याला रेड कार्ड मिळाल्याने भारताने सामना संपेपर्यंत १० खेळाडूंसोबत खेळला. तरीही भारताने निर्धारित सामना १-१ अशा बरोबरीत सोडवला. त्यानंतर पेनल्टी शूट आऊटमध्ये ४-२ ने भारताने सामना जिंकला. त्यामुळे आता भारताकडून सा-यांच्याच पदकाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
सामन्याच्या पूर्वार्धात भारतीय संघाने आक्रमक सुरुवात केली. सुरुवातीलाच भारताला रेड कार्ड मिळाले. त्यामुळे उर्वरित सामना भारताला १० खेळाडूंसोबत खेळावा लागला. दोन्ही संघांकडून गोल करण्याचा प्रयत्न सुरु होता. त्यात सुरुवातीला भारतीय संघ यशस्वी ठरला. २२ व्या मिनिटाला भारताकडून हरमनप्रीतने गोल केला आणि सामन्यात १-० ची आघाडी घेतली. रेड कार्ड मिळूनही भारताने ही आघाडी घेण्यात यश मिळवले. पण भारताचा हा आनंद फार काळ टिकला नाही. ग्रेट ब्रिटेनने त्यानंतर पाच मिनिटांत म्हणजे सामन्याच्या २७व्या मिनिटाला गोल केला. ग्रेट ब्रिटनच्या ली मॉर्टन याने गोल करून आपल्या संघाला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. त्यानंतर मात्र हाफ टाइमपर्यंत कुणीही आघाडी घेऊ शकले नाही.
तिस-या क्वार्टरमध्ये भारताने आपली रणनिती बदलली आणि बचावात्मक पवित्रा घेतला. गोल होऊ न देता आपला खेळ सुरु ठेवण्याचा भारताचा प्रयत्न होता. त्यात भारताला यश आले. तिस-या क्वार्टरमध्येही गोलसंख्या १-१ अशीच राहिली. चौथ्या आणि शेवटच्या क्वार्टरमध्ये भारताने आक्रमण केले. ग्रेट ब्रिटेन देखील आक्रमक झाला. पण अखेर निर्धारित सामन्यात भारताने ग्रेट ब्रिटनशी १-१ अशी बरोबरी कायम राखली.
गेल्या ऑलिम्पिकमध्ये काय घडले?
भारतीय हॉकी संघ टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतही ग्रेट ब्रिटनशी भिडला होता. गेल्या ऑलिम्पिकमध्येही उपांत्यपूर्व फेरीतच भारतासमोर ग्रेट ब्रिटनचे आव्हान होते. त्यावेळी भारताने ग्रेट ब्रिटेनला ३-१ अशी धूळ चारली होती.