नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या वतीने सांगण्यात आले की, एडनच्या खाडीमध्ये एमव्ही मार्लिन लुआंडा शिपवर हल्ल्याची खबर मिळाली. त्यानंतर आयएनएस विशाखापट्टणम तैनात करण्यात आलेली आहे. त्यापूर्वी शिप मार्लिन लुआंडाकडून एक धोक्याचा संदेश पाठवण्यात आलेला होता.
भारतीय नौदलाने सांगितले की, २६ जानेवारी रोजी रात्री मार्लिन लुआंडावरुन धोक्याचा कॉल मिळाला होता. त्यावरुन एडनच्या खाडीत आयएनएस विशाखापट्टणम तैनात करण्यात आले. नौदलाने पुढे सांगितलं, संकटग्रस्त मर्चंट वेसलला मदत पोहोचविण्यात येतेय. आयएनएस विशाखापट्टणमयाद्वारे अग्मिशमन उपकरणे तैनात करण्यात आलेली आहेत. मर्चंट शिपवर २२ भारतीय आणि एक बांगलादेशी चालक असल्याची माहिती आहे. समुद्रातील लोकांचा जीव वाचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं नौदलाच्या वतीने सांगण्यात आलेले आहे.
हुथी स्विकारली जबाबदारी
द गार्डियनच्या दाव्यानुसार, तेल जहाजावरील हल्ल्याची जबाबदारी येमेनच्या हुथी बंडखोरांनी स्वीकारली आहे. हुथीचे प्रवक्ते याह्या सारिया यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, आमचा प्रहार थेट होता. युनायटेड स्टेटनेही एमव्ही मार्लिन लुआंडावरील हल्ल्याची पुष्टी केली आहे.