दुबई : अनेक भारतीयांना अरब देशांतील लॉट-यांनी मालामाल केले आहे. वर्षाला दोन-तीन लॉटरींमध्ये भारतीयांचे नशीब फळफळतेच. परंतु फुकट तिकीट मिळाले आणि त्याने नशीब पालटले असा प्रकार कधी घडला असेल असे ऐकीवात नाही. युएईमध्ये एका भारतीयाला ही लॉटरी लागली आहे.
राजीव अरिक्कट या व्यक्तीने मोठी लॉटरी जिंकली आहे. बिग तिकीट अबुधाबी विकली ड्रॉमध्ये त्याने १५ दशलक्ष दिरहम जिंकले आहेत. भारतीय चलनात ही रक्कम ३३ कोटी रुपये होते. ज्या तिकीटावर त्याला हे पैसे मिळालेत ते त्याने खरेदी केलेच नव्हते.
राजीव यांच्या तिकीटाचा नंबर ०३७१३० आहे. रॅफल ड्रॉ २६० मध्ये त्यांना हे तिकीट फुकटात मिळाले होते. गेल्या तीन वर्षांपासून राजीव नशीब आजमावत होता. राजीव हे अल एन या आर्किटेक्चरल फर्ममध्ये काम करतात. मुलांच्या जन्माच्या तारखांचे आकडे असलेले तिकीट त्यांना मिळाले होते.
ही रक्कम तेव्हा जे १९ लोक लॉटरीची तिकिटे घेत होते त्यांच्यासोबत वाटायची असल्याचे राजीवने म्हटले आहे. सध्या आपण या रकमेचे काय करायचे हे ठरविले नाहीय. मी आणि माझ्या पत्नीने ७ आणि १३ क्रमांकाची तिकिटे निवडली होती, असे ते म्हणाले.