23 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeअंतरराष्ट्रीयसिगारेटसाठी भारतीय तरुणाची हत्या

सिगारेटसाठी भारतीय तरुणाची हत्या

अमेरिकेतील सुपरमार्केटमध्ये भारतीय तरुणावर गोळीबार

अर्कान्सस : अमेरिकेत सिगारेटचे पाकीट एका भारतीय तरुणाच्या मृत्यूचे कारण ठरले. दासरी गोपीकृष्ण असे मृत तरुणाचे नाव असून ते अमेरिकेतील सुपरमार्केटमध्ये काम करत होते. फक्त सिगारेटच्या पॅकेटसाठी त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. ही घटना २१ जून रोजी घडली. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३१ वर्षीय गोपीकृष्ण हे शनिवारी दुपारी दुकानाच्या काउंटरवर होते. यादरम्यान, अज्ञात हल्लेखोराने दुकानात घुसून गोळीबार केला. या गोळीबारात काउंटरवर उपस्थित असलेले गोपीकृष्ण गंभीर जखमी झाले. यावेळी हल्लेखोराने आपल्याला हवे असलेले सिगारेटचे पाकीट घेऊन तेथून पळ काढला. या घटनेनंतर गोपीकृष्ण यांना उपस्थित लोकांनी जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. मात्र, रविवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली आहे. ज्यामध्ये हल्लेखोर गोळीबार करताना स्पष्ट दिसत आहे.

गोपीकृष्ण हे आंध्र प्रदेशातील बापटला जिल्ह्यातील कर्लापलेम मंडलातील याजली येथील रहिवासी होते. नोकरीनिमित्त ते पत्नी आणि दीड वर्षाच्या मुलासह अमेरिकेला गेले होते. अमेरिकेत ते एका नातेवाईकाच्या घरी राहत होते. तसेच, गोपीकृष्ण हे अमेरिकेतील अर्कान्ससमधील एका सुपरमार्केटमध्ये काम करत होते. या गोळीबाराच्या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR