नवी दिल्ली/बीजिंग : मालदीवच्या माजी मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर भारतीय पर्यटकांनी त्या देशाकडे पाठ फिरविली आहे. मालदीवमध्ये जाणारे सर्वाधिक पर्यटक हे भारतीय असतात. मात्र, त्यांची संख्या काही दिवसांमध्ये घटली आहे. अशा परिस्थितीत मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मोइज्जू यांनी चीनकडे त्यांच्या देशातील पर्यटकांना पाठविण्यासाठी अक्षरश: लोटांगण घातले आहे.
मोइज्जू हे सध्या चीनच्या दौ-यावर आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळातील तीन मंर्त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्यानंतर भारतीय पर्यटक नाराज झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत एकूण पर्यटकांची संख्या वाढली आहे. मात्र, भारतीय पर्यटकांची संख्या स्थिर आहे. यात वाढ झालेली नाही. त्यावरूनच भारतीयांचा ओढा मालदीवकडे कमी झाल्याचे दिसून येते. त्याचवेळी चिनी पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे.
चिनी पर्यटक कसे वाढणार?
मोइज्जू यांनी चीनचे पंतप्रधान ली कियांग यांची भेट घेतली. चिनी पर्यटकांची संख्या कशी वाढविता येईल, याबाबत त्यांनी कियांग यांच्याशी चर्चा केली. दोन्ही देशांमध्ये थेट विमानसेवा सुरू करण्यावर भर देण्यात आला होता. भारतीयांनी पाठ फिरवल्यामुळे मोइज्जू यांना चीनपुढे हात पसरावे लागत आहेत.
मालदीवला जाणारे पर्यटक (वर्ष २०२३)
२,०३,१९८ भारतीय
१,८७,११८ चिनी
अनेकांचे बेत रद्द
पर्यटकांनी नव्या वर्षाच्या सुरुवातीसाठी बरेच आधीपासून बेत आखले होते. ते ऐनवेळी रद्द करणे शक्य नव्हते. मात्र, भविष्यातील बुंिकगमध्ये घट होत आहे.
यंदा किती पर्यटक गेले?
वाद निर्माण झाल्यानंतर नव्या वर्षात ९ जानेवारीपर्यंत ३,७९१ पर्यटक मालदीवला गेले. हा आकडा एकूण पर्यटकांच्या ७.४ टक्के आहे. गेल्या वर्षी भारतातून ३,३५६ पर्यटक मालदीवला गेले होते. पर्यटकांच्या आकड्यात किरकोळ वाढ झाली असली तरी प्रमाण तेवढेच आहे.
या ठिकाणांना अधिक पसंती
थायलंड, बाली, मलेशिया, व्हिएतनाम, अल्माटी, बाकू आणि त्बिलिसी.