नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणा-या ‘इंदिरा गांधी पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक’ आणि ‘नरगिस दत्त राष्ट्रीय एकात्मता सर्वोत्कृष्ट चित्रपट’ या दोन्ही राष्ट्रीय पुरस्कारांमधील अनुक्रमे दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि नरगिस दत्त यांची नावे वगळण्यात आली आहेत.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने स्थापन केलेल्या समितीने सुचविल्यानुसार ‘७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२२ नियमावली’मध्ये बदल करण्यात आले आहेत. तसेच दादासाहेब फाळके पुरस्कारासह अन्य पुरस्कारांच्या रोख रकमांतही वाढ करण्यात आली आहे. आता ‘इंदिरा गांधी पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक’ या पुरस्काराचे नाव ‘पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक’ असे करण्यात आले आहे. तसेच या पुरस्काराचे रोख पारितोषिक याआधी चित्रपटनिर्माता आणि दिग्दर्शकाला विभागून दिले जायचे.
नव्या बदलानुसार ते आता केवळ दिग्दर्शकालाच मिळेल. तर ‘नरगिस दत्त सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय एकात्मता चित्रपटा’चे नाव ‘राष्ट्रीय, सामाजिक आणि पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट’ असे बदलण्यात आले आहे. या श्रेणीत सामाजिक आणि पर्यावरण संवर्धनावरील चित्रपटांचाही समावेश करण्यात आला आहे तर भारतीय चित्रपटांमधील अतुलनीय योगदानाबद्दल दिल्या जाणा-या दादासाहेब फाळके पुरस्काराच्या रोख पारितोषिकाची रक्कम १० लाखांवरून १५ लाख करण्यात आली आहे.