मुंबई : प्रतिनिधी
सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर धारदार चाकूने वार करणा-या आरोपीचा अद्याप शोध लागलेला नाही. आज तिस-या दिवशीही पोलिसांच्या हाती काहीच धागेदोरे आलेले नाहीत. पोलिसांची ३५ पथके या चोराच्या मागावर आहेत. पण अद्याप थांगपत्ता लागत नाही. हा चोर गुजरातला पळाल्याची चर्चा होती. त्यामुळे गुजरातमध्येही पोलिस शोध घेत आहेत. तसेच चोर मध्य प्रदेशात लपल्याची खबर मिळताच पोलिस मध्य प्रदेशात गेले आणि एकाला ताब्यात घेतले. पण तो संशयित आहे.
अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मध्य प्रदेशातून एकाला ताब्यात घेतले. पण हा खरा आरोपी पकडला की चोरासारखा दिसणारा व्यक्ती पकडला, हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे. काल पोलिसांनी शाहीद नावाच्या एका तरुणाला पकडले होते. सैफवर हल्ला करणा-यासारखाच तो दिसत होता. त्यामुळे पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. पण चौकशीत तो चोर नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याला पोलिसांनी सोडून दिले. त्यामुळे मध्य प्रदेशातून ताब्यात घेतलेला व्यक्ती चोर आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
चोराचे लोकेशन ट्रेस करण्याचे काम
सैफवर झालेल्या हल्ल्याला तीन दिवस झाले आहेत. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला आहे. पोलिसांची ३५ पथके यासाठी काम करत आहेत. चोराचे लोकेशन ट्रेस केले जात आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज पाहून त्याचा फोटोही पोलिसांनी मिळवला आहे. मुंबई क्राईम ब्रँच आणि पोलिस संपूर्ण वांद्रे परिसरातील सीसीटीव्ही तपासत आहेत. त्यातच चोराचा फोटो सार्वजनिक करण्यात आला आहे. मात्र तरीही पोलिसांना अद्याप चोर सापडलेला नाही.