मुंबई (प्रतिनिधी) : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींची पात्रता तपासली जात असून ज्यांची पात्र नसतानाही नियमबा पद्धतीने अर्ज दाखल करून या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्याकडून घेतलेले पैसे परत घेतले जातील, असे महिला व बाल कल्याणमंत्री अदिती तटकरे यांनी आज जाहीर केले. पडताळणी सुरू झाल्याने अनेक महिला स्वत:च लेखी अर्ज देऊन योजनेतून बाहेर पडत आहेत. आतापर्यंत ४ हजार महिलांनी माघार घेतल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीत मोठा दणका बसल्याने सत्ताधारी महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी लोकप्रिय निर्णय घेण्याचा धडाका लावला होता. मध्य प्रदेशात यशस्वी ठरलेली लाडकी बहीण योजना आणून महिलांना प्रती महिना दीड हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून योजनेसाठी आलेल्या अर्जांची फारशी शहानिशा न करता हे अर्ज दणादण मंजूर करण्यात आले. राज्यातील २ कोटी ४० लाख महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला. निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नोव्हेंबरपर्यंतचे ५ महिन्यांचे पैसेही लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आले.
या योजनेचा निवडणुकीत महायुतीला मोठा फायदा मिळाला; पण निवडणूक झाल्यावर सरकारने अपात्र असतानाही योजनेत घुसलेल्या लोकांचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. अर्जांची पडताळणी केली जात आहे. पडताळणीत अपात्र ठरल्यास मिळवलेल्या लाभाची रक्कम दंडासहित वसूल करण्यात येण्याच्या भीतीने लाभार्थी महिलांनी अर्ज मागे घेण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ४ हजार महिलांनी माघार घेतल्याची माहिती समोर आली आहे.
या बाबत बोलताना महिला व बाल कल्याणमंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की, निकषाबाहेरील तक्रारी आलेल्या अर्जांबाबत पडताळणी सुरू आहे. ज्यांच्याकडे वाहने आहेत, उत्पन्न मर्यादा जास्त आहे, इतर योजनांचा लाभ घेणा-या लाडक्या बहिणींनी लाभ परत केला आहे. त्या लाडक्या प्रामाणिक बहिणींचे आभार. पात्र लाभाच्या पलीकडे रक्कम आल्यास बहिणीने ते परत करावे, अशी आम्ही विनंती केली. नियमबा पद्धतीने अर्ज दाखल करणा-या बहिणींचे पैसे परत घेतले जाणार आहेत. अर्ज पडताळणीमध्ये आम्हाला बोगस अर्जाबाबत माहिती मिळेल. पिवळे व केशरी कार्डधारक लाभार्थ्यांची पडताळणी होणार नाही. इतर योजनांचा लाभ घेणा-यांची पडताळणी केली जाणार आहे. सुरुवातीला जो शासन निर्णय जाहीर केलाय त्यानुसारच याची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेसाठी राज्यातील २ कोटी ६३ लाख महिलांनी अर्ज केले आहेत. यातील २ कोटी ४७ लाख महिला पात्र ठरल्या असून त्यातील २ कोटी ३४ लाख बहिणींना विधानसभा निवडणुकी अगोदर ५ महिने दरमहा दीड हजार रुपये देण्यात आले आहेत मात्र आता लाडकी बहीण योजनेतील अर्जांची पडताळणी होणार असून ही संख्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.