मुंबई : गणेशोत्सवासाठी केल्या जाणा-या गोड पदार्थांत वापरला जाणारा सुकामेवा यंदा भक्तांचा खिसा हलका करीत आहे. सर्वच सुकामेव्याच्या दरात २५ ते ३० टक्के वाढ झालेली आहे. प्रामुख्याने काजू, बदाम व अंजीर यांच्या दरातील वाढ मोठी आहे. परिणामी मोदकासह प्रसादासाठीचे गोड पदार्थ महागले आहेत.
विशेष म्हणजे चांगल्या काजूसाठी किलोमागे १ हजार ते १०५०-११०० रुपये मोजावे लागत आहेत.
तर अंजीर १६०० रुपये किलोवर पोहोचले आहेत. तर २१ मोदकांसाठी ३०० रुपयांहून अधिक मोजावे लागत आहेत. गणेशोत्सवात मोदक आणि मोतीचूरच्या लाडूंना सर्वाधिक मागणी असते. या दोन्हीमध्ये सुकामेव्याचा वापर होतो. त्याचवेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असो वा घरगुती, या ठिकाणी सुक्यामेव्याचा प्रसादासाठी मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळेच गणेशोत्सवात सुकामेव्याची मागणी वाढत असताना दरदेखील प्रचंड वाढले आहेत.
प्रसादामध्ये काजूला सर्वाधिक मागणी असते. मात्र मागील महिन्यात ७५० ते ८०० रुपये प्रति किलो असलेला काजू आता किमान ९५० रुपये प्रति किलो झाला आहे. ९५० रुपयांत तुकडा काजू आहे. चांगल्या व मोठ्या काजूचे दर १ हजार ते १०५०-११०० रुपये प्रति किलोवर गेले आहेत. अनेक ठिकाणी मोदकामध्ये नारळाच्या सारणासह अंजीरचे तुकडे टाकले जातात, मात्र हा अंजीरही आता १६०० रुपये किलोवर गेला आहे. मागील महिन्यापर्यंत हा दर ११०० रुपयांदरम्यान होता. यामध्ये १३००-१४०० रुपये प्रति किलोचा अंजीर उपलब्ध आहे. मात्र सुका व काळसर असून त्याची चवदेखील काहीशी कडवट आंबट असते. उत्तम अंजीरसाठी किलोमागे १६०० ते १८०० रुपये मोजावे लागत आहेत. सुदैवाने बदामाच्या दरात फार वाढ झालेली नाही. किरकोळ बाजारात बदाम ६०० ते ७०० रुपये प्रति किलोवर उपलब्ध आहेत.
मोदकासाठीची पिठी १४० रुपयांवर
गणपतीला मोदकाचा नैवेद्य असतो. हा मोदक प्रामुख्याने उकडीचा असून तो तांदळाच्या पिठीपासून तयार होतो. एरवी उत्तम दर्जाचा तांदूळ ६० रुपये किलोदरम्यान असतो. मात्र त्याच तांदळाची पिठी १२० ते १४० रुपये किलोने बाजारात विक्री होत आहे. वाढत्या मागणीमुळे दरवाढ झाल्याचे व्यापारी सांगतात. हल्ली गणेशोत्सवात महाप्रसाद किंवा प्रसाद वितरणाला महत्त्व वाढले आहे. सार्वजनिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर महाप्रसादाचे वितरण होते. त्यामध्ये बुंदीचे लाडू, बुंदीचे मोदक यांचा समावेश सर्वाधिक असतो. त्यामुळेच बेसन, तूप, काजू व किसमिस यांची मागणी आता पुढील १२ ते १५ दिवस सर्वधिक असेल, असे व्यापारी सांगतात.
पूजा साहित्याचे दर वाढले
अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची जोरात तयारी सुरू असून, यावर्षी मंडपापासून ते पूजासाहित्यापर्यंत सर्वच वस्तूंच्या दरात वाढ झाली आहे. हळद, कुंकू, सुपारी, शेंदूर, गुलाल, लवंगा, पवित्र धाग्याची जोडी, दुर्वा, कापूर, दिवा, धूप, पंचामृत, फळे, गंगाजल, कलश, अष्टगंध, गणेशाला फुलांची माळ, गुलाबपाणी, दिव्याची वात या सर्वांवरच जीएसटी लागल्याने यांच्या किमतीत वाढ होऊन खारीक ३० ते ४० रुपयांनी तर हळद-कुंकू १००ते २०० रुपयांनी वाढले आहे. यावर्षी हळकुंडाचा आणि कापराच्या दरात २० टक्के वाढ झाली आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. याशिवाय मोठी सुपारी, नारळाच्या दरात वाढ होऊन २५ ते ३० रुपयांपर्यंत एक नारळ आहे.