22.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeअंतरराष्ट्रीयमहागाईचा भस्मासूर, खर्चासाठी लोक विक्रीला!

महागाईचा भस्मासूर, खर्चासाठी लोक विक्रीला!

तेहरान : पाकिस्तानातील महागाईच्या बातम्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरत होत्या. आताही तिथली परिस्थिती फारशी सुधारलेली नाही. सध्या जगातील अनेक देश महागाईचा सामना करत आहेत. काही ठिकाणी महागाईने आतापर्यंत विक्रमी पातळी गाठली आहे. लोकांना दैनंदिन वस्तू खरेदी करणे देखील कठीण झाले आहे. सध्या इराणची स्थिती अतिशय भयंकर आहे. त्या ठिकाणचे लोक आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी बाळाचे किडणी आणि यकृतही विकायला तयार झाले आहेत. याबाबतचे पोस्टर अनेक ठिकाणी लावण्यात आले आहेत.

इराणमध्ये सध्या मोठे आर्थिक संकट आले आहे. यामुळे अनेक लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्याचा एक परिणाम म्हणजे काही लोक पैशासाठी त्यांच्या शरीराचे अवयव विकण्यास तयार झाले आहेत. इन्स्टाग्रामवर अशा अनेक पोस्ट पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये इराणी लोक त्यांची किडनी, यकृत आणि शरीराचे इतर अवयव विकण्यास तयार आहेत. द नॅशनलच्या वृत्तानुसार, इराणच्या काही शहरांमध्ये असे अनेक पोस्टर लावण्यात आले आहेत, ज्यामध्ये रक्तगट, वय आणि फोन नंबरची माहिती देण्यात आली आहे, जेणेकरून गरजू लोक थेट संपर्क करू शकतील. इराणची राजधानी तेहरानमध्येही असेच पोस्टर्स पाहायला मिळाले आहेत. शहरातील वलीसरा चौकात किडनी आणि यकृत विक्रीच्या जाहिराती पाहायला मिळतात.

महागाईची नेमकी स्थिती काय?
डिसेंबरमध्ये प्रसिद्ध झालेल्या वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या महागाई दर अहवालानुसार, इराणमध्ये चलनवाढीचा दर सध्या ३९.२ टक्के आहे. जे पाकिस्तानच्या २९.२ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. इराण फोकसच्या मते, इराणच्या सेंट्रल बँकेने ऑक्टोबर २०२३ मध्ये ५४.८ टक्के इतका महागाई दर नोंदवला होता. जो २२ महिन्यांतील सर्वोच्च आहे. २०२४ मध्येही इराणमधील चलनवाढीचा दर ३० टक्क्यांच्या आसपास राहील, अशी आयएमएफला अपेक्षा आहे.

इरणाचे चलन सर्वात कमकुवत
इरणाचे चलन हे सध्या डॉलरच्या तुलनेत जगातील सर्वात कमकुवत चलनांपैकी एक आहे. सध्या, ४२,२७५ इराणी रियाल १ डॉलरसाठी उपलब्ध आहेत. एनबीटीच्या अहवालानुसार २०२२ मध्ये इराणी रियाल हे जगातील सर्वात कमकुवत चलन मानले गेले.

इराणमध्ये आर्थिक संकट?
अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांमुळे इराणच्या आर्थिक परिस्थितीत अनेक संकटे आली आहेत. या निर्बंधांचा व्यापार आणि आर्थिक संबंधांवर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे अनेक देश इराणसोबत व्यापार करू शकत नाहीत. तसेच इराणला राजकीयदृष्ट्या कमकुवत करण्याचे काम केले आहे. इतकेच नाही तर इराणही यावेळी गाझाला पाठिंबा देत असल्यामुळे त्याला युद्धाचा खर्च उचलावा लागत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR