सांगली : प्रतिनिधी
कथित आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिच्या दिव्यांग प्रमाणपत्रामधील बोगसगिरी उजेडात आल्यानंतर महाराष्ट्रभरात चौकशी सत्र सुरू झाले आहे. दिव्यांगांसाठीच्या राखीव जागेवर नोकरी मिळविलेल्या ३५९ उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसा आदेश दिव्यांग कल्याण आयुक्तांनी सर्व जिल्हाधिका-यांना दिला आहे.
यासंदर्भात ‘दिव्यांग कल्याण मंत्रालय दिव्यांगांच्या दारी’ अभियानाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी शासनाकडे चौकशीची मागणी केली होती. राज्यभरातील कथित बोगस दिव्यांग कर्मचा-यांची यादी त्यांनी शासनाला दिली असून, त्यामध्ये सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील काही कर्मचा-यांचाही समावेश आहे.
बोगस उमेदवारांमुळे दिव्यांगांवर अन्याय होत असून, ते नोकरीपासून वंचित राहत आहेत, त्यामुळे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या धर्तीवर दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणीसाठी मध्यवर्ती समिती स्थापन करण्याची मागणी कडू यांनी केली आहे.
कडू यांनी १९ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत बोगस दिव्यांग प्रमाणपत्र शोध अभियान राबविले होते, त्यातून शासकीय व निमशासकीय विभागांत ३५९ बोगस उमेदवार आढळले आहेत. ही यादी त्यांनी दिव्यांग कल्याण आयुक्तालयाकडे दिली. त्यानुसार आयुक्तांनी यादीतील दिव्यांग कर्मचा-यांच्या प्रमाणपत्राच्या चौकशीचा आदेश जिल्हाधिका-यांना दिला आहे.
साता-यात १२, कोल्हापुरात ८ संशयित प्रमाणपत्रे
बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण आयुक्तालयाला सादर केलेल्या यादीनुसार सातारा जिल्ह्यात १२, कोल्हापूर जिल्ह्यात आठ व सांगली जिल्ह्यात पाच दिव्यांग शासकीय व निमशासकीय सेवेत आहेत. त्यांची दिव्यांगत्वाची प्रमाणपत्रे बोगस असल्याचा संशय आहे. कृषी, महसूल, उपप्रादेशिक परिवहन, आदी विभागांत ते कार्यरत आहेत.