कोची : अरबी समुद्रात भारतीय नौदलाचे वर्चस्व दिसून येते. भारतीय युद्धनौका आयएनएस सुमित्रा यांनी सोमवारी एडनच्या आखातात सोमाली चाच्यांना चोख प्रत्युत्तर दिले आणि १९ पाकिस्तानी नागरिकांसह एका इराणी जहाजाला वाचवले आहे. या लोकांनी मासेमारी करणा-यांच्या जहाजाचे अपहरण केले होते. रविवारी जहाजातून इमर्जन्सी कॉल आला. यानंतर युद्धनौकेने चाचेगिरीविरोधी मोहीम सुरू केली आणि मोठे यश मिळविले.
भारतीय नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, आमच्या युद्धनौकेने अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडला आहे. १९ पाकिस्तानी नागरिकांसह एका जहाजाची कोचीच्या किना-यावर सुटका करण्यात आली आहे. २८ जानेवारी रोजी इराणी ध्वज असलेल्या मासेमारी जहाजाचे अपहरण झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर भारतीय युद्धनौका आयएनएस सुमित्राने पुढाकार घेतला.
अपहरणाचे प्रयत्न हाणून पाडले
सोमालियाच्या पूर्व किना-याजवळ सोमाली चाच्यांनी अपहरण केलेल्या १९ पाकिस्तानी नागरिकांना घेऊन गेलेल्या जहाजाची सुटका केली. भारतीय नौदलाने २४ तासांत अरबी समुद्रात अपहरणाचे दोन मोठे प्रयत्न हाणून पाडले आहेत. २८-२९ जानेवारीला समुद्री चाच्यांनी जहाजाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. अलीकडेच भारतीय नौदलाने एडनच्या आखातात तीन युद्धनौका पाठवल्या आहेत.