नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो आज आपला महत्वाकांक्षी उपग्रह इन्सॅट- ३डीएस लॉन्च करणार आहे. या उपग्रहाला ‘नॉटी बॉय’ या रॉकेटद्वारे लॉन्च करण्यात येणार आहे. इन्सॅट- ३डीएस हा उपग्रह हवामान आणि नैसर्गिक संकटांची अचूक माहिती देऊ शकणार आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात येणारी चक्रीवादळे आणि अतिवृष्टीपासून बचावासाठी अधिक चांगल्यापद्धतीने योग्य उपायोजना करणे शक्य होणार आहे.
इन्सॅट- ३डीएस या उपग्रहाचे प्रक्षेपण शनिवारी संध्याकाळी ५.३५ वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन स्पेस रिसर्च सेंटर इथून होणार आहे.
‘नॉटी बॉय’ने होणार प्रक्षेपण
इन्सॅट ३डीएसचे प्रक्षेपण ज्या रॉकेटद्वारे केले जाणार आहे. त्याचे नाव जीएसएलव्ही- एफ १४ असे आहे. यालाच नॉटी बॉय असेही म्हटले जाते. नॉटी बॉय यासाठी की याद्वारे ही १६ वी मोहिम पार पडणार आहे.
यापूर्वी या रॉकेटद्वारे करण्यात आलेल्या ४० टक्के मोहिमा अपयशी ठरल्या आहेत. इस्रोने सांगितले की, इन्सॅट- ३डीएस हा लॉन्च करण्यात येणारा उपग्रह २०१३ मध्ये लॉन्च करण्यात आलेल्या इन्सॅट ३डी उपग्रहाचे अत्याधुनिक रुप आहे, यामुळे हवामानाची नेमकी माहिती कळू शकेल.