ढाका : बांगलादेशातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा त्या भारताकडे येण्यासाठी रवाना झाल्याची चर्चा आहे. पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांची बहीण रेहाना देश सोडून लष्करी हेलिकॉप्टरने भारतात येत असल्याचा दावा करण्यात येत आहे.
या घटनेनंतर बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमान यांनी सोमवार दि. ५ ऑगस्ट देशाला संबोधित केले. लष्करप्रमुख म्हणाले की, देशात ४८ तासांत अंतरिम सरकार स्थापन केले जाईल. शेख हसीना बांगलादेशचे पंतप्रधानपद सोडून भारतातील आगरतळा शहरात रवाना झाल्या आहेत.
दरम्यान, बांगलादेशी विद्यार्थी गेल्या महिन्यापासून शेख हसीना यांच्या विरोधात आंदोलन करत होते. हे आंदोलन खूपच हिंसक झाले होते. नोक-यांमधील आरक्षणाविरोधात जुलै महिन्यात झालेल्या हिंसक आंदोलनात अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर बांगलादेशातील आरक्षणविरोधी आंदोलन आणखी तीव्र झाले आहे. हजारो आंदोलक शेख हसीना यांच्या निवासस्थानी घुसले आणि तोडफोड केली.
काय म्हणाले लष्करप्रमुख?
लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमान म्हणाले की, पंतप्रधान हसीना यांनी राजीनामा दिला आहे, अंतरिम सरकार देश चालवेल. आम्ही देशात शांतता परत आणू. आम्ही नागरिकांना हिंसा थांबवण्याची विनंती करतो. गेल्या काही आठवड्यात झालेल्या सर्व हत्यांचा तपास करू. तसेच, लष्कराने सर्व जबाबदारी घेतली आहे. सर्व हत्येचा खटला चालणार आहे. आपण सर्वांनी संघर्ष न करता शांततेच्या मार्गावर परत येऊ या. मी सर्व जबाबदारी घेतो, असेही लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमान यांनी सांगितले.
याचबरोबर, सर्वसमावेशक सरकारबाबत राजकीय पक्षांशी चर्चा झाली आहे. त्यापैकी बीएनपी, जमात इस्लाम अमीर, मामुनुल हक, डॉ. आसिफ नजरुल चर्चेत होते. मात्र, अवामी लीगचे कोणीही नव्हते, असे लष्करप्रमुख वकार-उझ-झमान म्हणाले. दरम्यान, आंदोलक करणा-यांना घरी परतण्याचे आवाहन लष्करप्रमुख वकार-उझ-झमान यांनी केले आहे.