कॅलिफोर्निया : आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर सुनील यादव याची लॉरेन्स बिश्नोई गँगने गोळ्या घालून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतली कॅलिफोर्निया येथे दोन दिवसांपूर्वी यादव याची हत्या करण्यात आली आहे.
स्टॉकटोन भागातील ६७०० ब्लॉक येथील घरात घुसून यादव याची हत्या करण्यात आली आहे. दरम्यान सोमवारी अमेरिकास्थित गोल्डी ब्रार आणि रोहित गोदारा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. ब्रारच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, सर्व भावांसाठी, मी, रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार, कॅलिफोर्नियामध्ये सुनील यादव उर्फ गोलीच्या हत्येची संपूर्ण जबाबदारी स्वीकारतो. आमचा प्रिय भाऊ अंकित भादू याचे एन्काउंटर घडवून आणण्यासाठी त्याने पंजाब पोलिसांशी हातमिळवणी केली. आम्ही त्याच्या मृत्यूचा बदला घेतला.
हत्येमागील कारण काय?
ब्रार याच्याकडून ज्या घरात यादव याची हत्या करण्यात आली त्या घराचा नंबर (६७०६) देखील देण्यात आला आहे. या पोस्टमध्ये पुढे सुनील यादव हा अंमली पदार्थांच्या व्यापारात गुंतलेला होता, तसेच पंजाब, हरियाणा आणि राजस्थान येथे अंमली पदार्थांचा पुरवठा करणे आणि पोलिसांशी संबंध असल्याचा आरोपही या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. तसेच अंकित भादू एन्काउंटर प्रकरणात त्याचा सहभाग उघड झाल्यानंतर तो अमेरिकेत पळून गेल्याचा दावाही या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.