मुंबई : लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशात विरोधी पक्षातील नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागलेला दिसतो. पुढच्या तीन दिवसांत महाविकास आघाडीतील तीन नेत्यांची तपास यंत्रणांकडून चौकशी होणार आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर, ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. आज, उद्या आणि परवा या नेत्यांची चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते ईडीच्या रडारवर असल्याचे पाहायला मिळत आहे.
वायकरांची आज ईडी चौकशी
ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांची आज ईडी चौकशी होणार आहे. आज सकाळी ११ वाजता मुंबईत ईडी कार्यालयामध्ये त्यांची चौकशी केली जाणार आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी रवींद्र वायकर यांची आज चौकशी होणार आहे. रवींद्र वायकरवर ईडीकडून मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.रवींद्र वायकरांवर बनावट कागदपत्र बनवण्याचा ईडीचा आरोप आहे. त्यामुळे आज रवींद्र वायकर ईडीकडे चौकशीसाठी जाणार की नाही हे पाहावे लागेल.
रोहित पवारांची उद्या चौकशी
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची उद्या ईडी चौकशी होणार आहे. या चौकशीवेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे राष्ट्रवादीच्या कार्यालयात असणार आहेत. राष्ट्रवादीचे हे कार्यालय ईडीच्या कार्यालयापासून केवळ हाकेच्या अंतरावर आहे. याच कार्यालयात शरद पवार असणार आहेत. रोहित पवार यांचे समर्थकही राष्ट्रवादीच्या कार्यालयाजवळ जमणार आहेत. त्यामुळे आता या चौकशी दरम्यान काय घडते हे पाहणे महत्त्वाचे असेल.
किशोरी पेडणेकरांची परवा चौकशी
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची परवा ईडी चौकशी होणार आहे. या चौकशीवर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली. मुळात मला असे वाटते की ईडी आपल्या ऑफिसमध्ये बसतेय की कुणाच्या घरी? कोविड घोटाळ्याशी माझा काडीचाही संबंध नाही. मी कुठलाही गुन्हा केला नाही. माझ्यापर्यंत अजून नोटीस पोहोचली नाही. आली तर मी चौकशीला नक्की जाईल मात्र मला अजून नोटीस आली नाही, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.