27.5 C
Latur
Sunday, March 23, 2025
Homeमहाराष्ट्रमुंबईतील रस्ते घोटाळ्याची चौकशी करा

मुंबईतील रस्ते घोटाळ्याची चौकशी करा

आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : प्रतिनिधी
मुंबई महापालिकेने सन २०२३- २४ या कालावधीत सुरू केलेल्या सर्व रस्त्यांच्या कामाची आणि त्यातील निविदा प्रक्रियेमधील घोटाळ्याची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या घोटाळ्यात सहभागी असलेले कंत्राटदार, अधिकारी आणि इतर दोषी व्यक्तींवर लवकरात लवकर कारवाई केली जावी, अशी विनंती ठाकरे यांनी केली आहे.

सध्या सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत मुंबईतील बहुतांश आमदारांनी मुंबईतील रस्ते काँक्रीटीकरणाच्या कामावर आक्षेप नोंदवून तक्रारी केल्या आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी शनिवारी फडणवीस यांना पत्र लिहून मुंबईत सुरू असलेल्या रस्ते कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मी आपणास मुंबई महानगरपालिकेतील सन २०२३- २४ या कालावधीत मुंबईतील सिमेंट रस्ता काँक्रीटीकरणातील घोटाळ्याबाबत अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत.

सन २३-२४ या कालावधीतील सिमेंट रस्ता काँक्रीटीकरणाच्या निविदा प्रक्रियेवर अनेक पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी घोटाळ्याचा आरोप केला आहे. शुक्रवार, २१ मार्च रोजी सभागृहात सत्ताधारी पक्षाच्या अनेक आमदारांनी याबाबत तक्रारी केल्या आहेत. आपणास माहीतच आहे की, मुंबईतील सर्व रस्ते एकतर खोदून ठेवलेले आहेत किंवा अर्धवट कामामुळे वाहतुकीची अडचण करून ठेवलेली आहे असे आदित्य ठाकरे यांनी पत्रात नमूद केले आहे.

दरम्यान, आपल्या मुंबईत गेल्या दोन वर्षांपासून जिथे तिथे रस्त्यांची कामे सुरू आहेत, रस्ते बंद आहेत, धूळीचे साम्राज्य आहे. पण त्यापेक्षा भयंकर म्हणजे सरसकट कॉक्रिटीकरणाच्या नावाखाली मुंबईकरांची तिजोरी रिकामी करण्याचा हा महाघोटाळा सुरु आहे. ज्यावर मी सातत्याने आवाज उठवत आलोय. आज पुन्हा एकदा मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या घोटाळ्याची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे. मुंबईकरांच्या कष्टाचा पैसा आम्ही असा वाया जाऊ देणार नाही. मुंबईची होत असलेली वाताहत आम्ही थांबवल्याशिवाय राहणार नाही, असे आदित्य ठाकरे यांनी एक्स या समाज माध्यमात लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR