लातूर : प्रतिनिधी
स्वयंघोषित ‘जननायक’ ही पदवी स्वत:ला बहाल करून घेणारे माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर अध्यक्ष असलेल्या जयक्रांती शिक्षण प्रसारक मंडळाद्वारा (जेएसपीएम) संचलित येथील जुन्या एमआयडीसी परिसरातील स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ वसतिगृहात इयत्ता ७ वी वर्गात शिक्षण घेत असलेल्या १३ वर्षीय मुलाचा दि. २९ जुलै रोजी संस्थेच्या वसतिगृहात संशयास्पद मृत्यू झाला होता. नेमकी त्या रात्री सदरील वसतिगृहात अशी कोणती घटना चिमुकल्या अरविंदच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारी घडली., याचा जसा संशय अरविंदच्या नातलगांना आहे तसाच संशय या घटनेचा तपास करणा-या लातूर एमआयडीसी पोलिसांना असून याचा वसतिगृहातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
अरविंद खोपे या अल्पवयीन मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना मंगळवार, दि. २९ जुलैच्या रात्री घडली. मुलाचा खून करण्यात आल्याचा आरोप चिमुकल्या अरविंदच्या पालक व नातेवाईकांकडून केला जात आहे. यामुळे देशभरात नवाजलेल्या लातूरच्या शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. वसतिगृहात त्या रात्री नेमकी काही तरी अनुचित घटना घडावी व यातूनच अरविंदचा मृत्यू झाला असावा, असा संशय अरविंदच्या नातलगांना आहे. तसा संशय व्यक्त करीत पालक घटना घडल्या दिवसापासून टाहोही फोडत आहेत. नेमका अरविंदच्या नातलगांच्या या संशयाचा धागा पकडून लातूर एमआयडी पोलिस वसतिगृहातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून याचा शोध घेत आहेत. अरविंदचे मावस काका सहदेव गणपती तरकसे, रा. मोतीनगर, लातूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणा-या वसतिगृह व्यवस्थापक विठ्ठल सूर्यवंशी व विनायक टेकाळे यांना गजाआड केले असले तरी या घटनेमागे जयक्रांती शिक्षण प्रसारक मंडळाच्या (जेएसपीएम) पदाधिका-यांचे हात व पाठबळ असल्याची चर्चा लातूर जिल्ह्यात सुरू आहे.
सूर्यवंशी व टेकाळेस ५ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी
वसतिगृहात अरविंद खोपे या १३ वर्षीय चिमुकल्याच्या मृत्यूचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी सदरील वसतिगृहातील व्यवस्थापक विठ्ठल सूर्यवंशी व विनायक टेकाळे यांना गजाआड केले असून आज त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दि. ५ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.