मुंबई : देशभरात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार चर्चा रंगली आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी होणार असून त्याकरता बॉलिवूडसह दाक्षिणात्य सिनेविश्वातील मंडळींनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी जवळपास ८ हजार लोकांना आमंत्रण पाठवण्यात आले आहे, त्यात या सिनेविश्वातील १९ मंडळींचा समावेश आहे.
रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत सीता मातेची भूमिका साकारणा-या अभिनेत्री दीपिका चिखलिया आणि प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांना राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मिळाले आहे. महानायक अमिताभ बच्चन, अनुपम खेर, अक्षय कुमार, संजय लीला भन्साळी, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या जोडप्यालाही अयोध्येतील या सोहळ्याचे निमंत्रण आहे.
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत यांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण आहे. याशिवाय अभिनेता प्रभासला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. २०२३ मध्ये रिलीज झालेल्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटात त्याने प्रभू श्रीरामांची भूमिका साकारली होती. एवढेच नाही तर प्रभासने या सिनेमाचा ट्रेलरही अयोध्येत लाँच केला होता. प्रभासशिवाय सुपरस्टार चिरंजीवी, ऋषभ शेट्टी आणि मोहनलाल यांनाही निमंत्रण आहे.
कंगनाला निमंत्रण नाही
माधुरी दीक्षित, सनी देओल, अजय देवगण, आयुष्मान खुराणा आणि टायगर श्रॉफ यांनाही राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. या सोहळ्यासाठी बॉलिवूडच्या १२ कलाकारांना निमंत्रण मिळाले आहे, मात्र असे समोर आले आहे की, कंगना राणावतला निमंत्रण देण्यात आलेले नाही. याआधी कंगना दोनदा अयोध्येत गेली आहे.