24.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeराष्ट्रीयसोनिया गांधी, खर्गे यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रण

सोनिया गांधी, खर्गे यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रण

अयोध्या : अयोध्येत सोमवारी २२ जानेवारीला राम मंदीर प्रतिष्ठापणा होत आहे. यासाठी देशातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष काँग्रेसच्या देखील महत्त्वाच्या नेत्यांना देखील आमंत्रण देण्यात आले आहे अशी अधिकृत माहिती काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ता जयराम रमेश यांनी दिली आहे.

काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटले आहे की काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना सोमवारी २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत होणा-या राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाले आहे. यावर योग्य वेळी निर्णय घेतला जाईल आणि कळवले जाईल असे देखील जयराम रमेश यांनी स्पष्ट केले आहे. सोमवारी २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी काँग्रेसचे लोकसभेचे नेते अधीर रंजन चौधरी यांना देखील आमंत्रित करण्यात आले आहे.

यासोबतच माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, रामनाथ कोविंद यांच्यासह सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रित करण्यात आले आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि एच डी देवेगौडा यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. आणखी निमंत्रण पाठवण्याची प्रक्रिया सुरू असून येत्या काही दिवसांत विरोधी पक्षांच्या काही नेत्यांना निमंत्रणे मिळणार आहेत. दरम्यान, या समारंभासाठी सर्व राष्ट्रीय राजकीय पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र त्यात काही राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्यातील राजकीय पक्षांचे प्रमुख निमंत्रितांच्या यादीत नाहीत.

काँग्रेसची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदींना या कार्यक्रमाचे सर्वात आधी निमंत्रण देण्यात आले होते. त्यानंतर यावर राजकीय वर्तुळातून जोरदार टीका करण्यात आली होती. देव फक्त एका पक्षाचे आहेत का असा प्रश्न विचारात सर्वांनाच निमंत्रण दिले पाहिजे, अशी भूमिका काँग्रेसने घेतली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR