नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग २०२४ ची बीसीसीआयने जोरदार तयारी सुरू केली आहे. नुकताच दुबईमध्ये मिनी लिलाव संपला, जिथे खेळाडूंवर पैशांचा वर्षाव झाला. आता बीसीसीआयने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
आयपीएल २०२४ साठी टायटल स्पॉन्सरचा शोध सुरू आहे, यावेळी बीसीसीआय चीनला टायटल स्पॉन्सरशिपसाठी बंदी घालण्याच्या तयारीत आहे.
क्रिकबजच्या रिपोर्टनुसार, आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशिपसाठी बीसीसीआयने काढलेल्या टेंडरमध्ये हे स्पष्टपणे लिहिले आहे की, ज्या देशांचे भारताशी मैत्रीपूर्ण संबंध नाहीत त्यांना या निविदेत महत्त्व दिले जाणार नाही.
टायटल स्पॉन्सरशिपची मूळ किंमत प्रति वर्ष ३६० कोटी रुपये आहे, त्यानंतर बोलीच्या आधारे निविदा दिली जाईल. मात्र बीसीसीआयने कोणत्याही देशाचा किंवा ब्रँडचा स्पष्ट उल्लेख केलेला नाही. बीसीसीआयचा हा निर्णय लोकांच्या प्रतिक्रिया आणि चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी ‘व्हिवो’च्या नकारात्मक अनुभवामुळे घेतल्याचे मानले जात आहे.
यापूर्वी चिनी फोन कंपनी व्हिवो ही आयपीएलची प्रायोजक होती, परंतु २०२० मध्ये भारत-चीन सीमेवर परिस्थिती बिघडली तेव्हा बीसीसीआयने व्हिवोला काढून टाकण्याचा निर्णय घेतला आणि टाटा एक वर्षासाठी टायटल स्पॉन्सर म्हणून आले.