नवी दिल्ली : आयपीएस अधिकारी नलिन प्रभात यांना जम्मू-काश्मीरचे नवे विशेष महासंचालक बनवण्यात आले आहे. प्रभात हे सध्याचे डीजीपी आरआर स्वेन यांची जागा घेणार आहेत. स्वेन हे ३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने हा आदेश जारी केला आहे. सरकारचा हा आदेश अशा वेळी आला आहे जेव्हा जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. याशिवाय जम्मू-काश्मीरमध्ये वाढत्या दहशतवादी घटनांदरम्यान हा निर्णय घेण्यात आला आहे.
नलिन प्रभात हे १९९२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते आंध्र प्रदेश केडरचे अधिकारी आहेत. या ५५ वर्षीय प्रभात यांना तीन वेळा पोलिस शौर्य पदक मिळाले आहे. प्रभातने यापूर्वी आंध्र प्रदेशातील नक्षलविरोधी पोलिस दल ग्रेहाऊंड्यचे नेतृत्व केले आहे. प्रभात यांनी सीआरपीएफमध्ये आयजी ऑपरेशन्स आणि जम्मू-काश्मीरच्या एडीजी म्हणून काम केले आहे.
नलिन याआधीही जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असल्याने, काश्मीर त्यांच्यासाठी नवीन क्षेत्र नाही. विशेष बाब म्हणजे नलिन सध्या ब्लॅक कॅट या नावाने प्रसिद्ध असलेल्या एनएसजीचे महासंचालक असून, ते हिमाचल प्रदेशातील रहिवासी आहेत. त्यांचा जन्म १४ मार्च १९६८ रोजी थुंग्री गावात झाला. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन कॉलेजमधून एम. ए. केले आहे.
नलिन यांच्यावर असतील या महत्त्वाच्या जबाबदा-या
जम्मू-काश्मीर पोलिसांची कमान सांभाळण्यासोबतच नलिन यांच्याकडे अनेक मोठ्या जबाबदा-याही असतील. तीन प्रमुख जबाबदा-यांबद्दल सांगायचे तर, सर्वप्रथम त्यांना राज्यातील विधानसभा निवडणुका शांततेत पार पाडाव्या लागतील. दुसरी महत्त्वाची जबाबदारी म्हणजे राज्यातील वाढत्या दहशतवादी कारवायांवर नियंत्रण ठेवणे आणि तिसरी महत्त्वाची जबाबदारी म्हणजे काश्मीरमध्ये शांतता राखणे.