25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeसंपादकीयइराण-पाक संघर्ष!

इराण-पाक संघर्ष!

रशिया-युक्रेन युद्ध कमी होते म्हणून की काय आता इराण-पाकिस्तानमध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे. २०२३ नंतर आता २०२४ मध्येही सारे जग युद्ध आणि संघर्षाच्या छायेतच राहील असे दिसते. हमास-इस्त्रायल संघर्षानंतर धुमसत्या मध्य पूर्वेतील अशांतता कमी म्हणून की काय त्यात इराण-पाकिस्तान यांच्यात हल्ला प्रतिहल्ल्याची ठिणगी पडली आहे. बुधवारी इराणने पाकिस्तानवर मिसाईल हल्ले करून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. गुरुवारी पाकनेही प्रतिहल्ला केला. इराणने पाकमधील ‘जैश-अल-अदल’ या दहशतवादी संघटनेच्या तळाला लक्ष्य केले. या हल्ल्यात काही दहशतवादी ठार झाल्याचा दावा इराणने केला. इराणचा हल्ला हा आमच्या सार्वभौमत्वावरील हल्ला असे म्हणत पाकनेही इराणमधील बलुच बंडखोरांच्या अड्ड््यांना मिसाईलने बेचिराख केले. या दोन्ही देशांतील संघर्ष यानिमित्ताने उफाळून आला असला तरी तो नवीन नाही. यापूर्वीही इराण-पाक सीमेवर अधूनमधून गोळीबाराच्या घटना घडत होत्या. यंदा पहिल्यांदाच थेट एकमेकांच्या हद्दीत मिसाईल डागल्यामुळे या संघर्षाची तीव्रता वाढलेली दिसते. इराण-पाकची सीमा सुमारे ९०६ कि. मी. ची आहे. दोन्ही देशांना इस्लामिक, सुन्नीबहुल पाक आणि इराणमधील शिया बहुसंख्य सुन्नी-शिया संघर्षाची किनार लाभली असली तरी दोन्ही देशांचे संबंध कधीही युद्धस्थितीपर्यंत पराकोटीचे ताणले गेले नव्हते.

मात्र या दोन्ही देशांनी एकमेकांविरोधातील अतिरेकी गटांना खतपाणी घातले आहे. या गटांना केवळ सहानुभूती नव्हे तर अर्थसाहाय्यापासून शस्त्रास्त्रांचा पुरवठाही केला आहे. म्हणजे दोन्ही देश आमने सामने उभे ठाकले नसले तरी अशा प्रकारे अतिरेक्यांची ढाल पुढे करीत त्यांचे ‘छुपे युद्ध’ सुरूच होते. पाकने प्रारंभाासूनच हीच नीती केवळ भारताविरुद्ध नव्हे तर इराण, अफगाणिस्तान या शेजा-यांविरोधात वापरली. मग इराणने पाकविरोधात हल्ल्याचा नेमका मुहूर्त का निवडला असा प्रश्न पडणे साहजिक आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे पाकिस्तानमध्ये सध्या लोकनिर्वाचित सरकार नसून काळजीवाहू सरकार आहे. शिवाय तेथे अन्नान्न दशा आहे. कमालीच्या महागाईमुळे देशात बंडाळी माजली आहे. पाकचे लष्करप्रमुख नुकतेच अमेरिकेच्या दौ-यावरून परतले होते. इराण अमेरिकेला आपला कट्टर शत्रू मानतो. त्यामुळे पाकची अमेरिकेसोबतची जवळीक इराणला रुचणारी नव्हती. भविष्यात अमेरिका पाक भूमीचा वापर आपल्याविरुद्ध करेल, अशी भीतीही इराणला वाटत होती. अफगाणिस्तानमधील तालिबानी राजवटीचे आणि पाकिस्तानचे संबंधही बिघडलेले आहेत.

आर्थिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या पाकिस्तान हतबल झाला आहे तसेच तेथे पुढील महिन्यात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. अशा या पाकमधील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर इराणने हल्ल्याची नामी संधी साधलेली दिसते. या हल्ल्याच्या दोन दिवस आधी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकरही इराण दौ-यावर होते. जैश-अल-अदल ही दहशतवादी संघटना इराणमध्ये अस्थैर्य माजविण्यासाठी प्रयत्नशील होती. इराण आणि पाकिस्तान या दोन्ही मुस्लिम देशांनी आपापल्या देशात दहशतवाद्याला आश्रय दिल्याचे दिसून येते. त्यामुळे ख-या अर्थाने दहशतवाद विरुद्ध दहशतवाद असा हा सामना रंगताना दिसतो. इराण आणि पाकिस्तान या दोन्ही देशात अंतर्गत कलह आहे. त्यामुळे मुख्य प्रश्न आहे तो दहशतवादाचा-पाकिस्तानचा भारताविरुद्धचा दावा सा-या जगाला माहीत आहे. दहशतवाद हे संपूर्ण मानव जातीवरचे संकट असल्याची भूमिका भारताने कायमच मांडली आहे. भारताबरोबरच अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स आणि इस्त्रायल अशा सगळ्याच देशांना दहशतवादाची झळ बसली आहे. मात्र आता इस्लामी राष्ट्रेही दहशतवादाच्या तडाख्यात सापडताना दिसत आहेत. त्याची झळ इराणलाही बसली आहे.

जगभरातील सर्वच दहशतवादी संघटनांचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत पोहोचल्याचे अनेक देशांना दिसून आले आहे. त्यानुसार या देशांनी कारवाईही केली आहे. मात्र दहशतवाद हाच जर पाकिस्तानने आपल्या राजकीय धोरणाचा भाग म्हणून स्वीकारला असेल तर त्यांचे भविष्य अंध:काराच्या दिशेने वाटचाल करीत आहे यात शंका नाही. इराणचा पाकच्या भूभागातील हल्ला हा प्रामुख्याने जैश-अल-अदलला लक्ष्य करण्यासाठी होता. या संघटनेच्या खुणा यापुढेही आढळून आल्या तर आम्ही पुन्हा हल्ला करू, असेही इराणने म्हटले आहे. अमेरिकेने पाकमध्ये घुसून दहशतवादी ओसामा बिन लादेनला ठार केले होते आणि त्याचा मृतदेह समुद्रात फेकला होता. त्याच वेळी पाकिस्तानची दातखीळ बसली होती. पाकिस्तानी लष्कर आणि कुख्यात आयएसआय या गुप्तचर संघटनेला ही सणसणीत चपराक होती. इराणच्या हल्ल्यानंतर पाकने तेहरानमधील आपल्या राजदूताला माघारी बोलाविले आणि आपल्या देशातील इराणच्या दूताला देश सोडण्यास सांगितले. अर्थात हा एक प्रक्रियेचा भाग असतो.

आम्हाला हा प्रकार रुचला नाही हे त्यातून सूचित करायचे असते. पाकने तेच केले. मात्र असे प्रकार का होत आहेत आणि तसे सातत्याने होण्याची शक्यता नाकारता येत नाही हा बोध पाकने घेणे अत्यंत गरजेचे आहे. तो त्यांनी घेतला नाही तर त्यामुळे विनाकारण जगाला युद्धाची झळ सहन करावी लागेल. इराणच्या हल्ल्याला आणखी एक कंगोरा आहे, तो म्हणजे इस्त्रायल-हमास युद्धाचा. या आंतरराष्ट्रीय मुद्यावरून सध्या जे राजकारण सुरू आहे ते प्रामुख्याने इस्लामी देशांना प्रभावित करीत आहे. हमासला इराणची फूस आहे असे म्हटले जाते. कारण उघडपणे हमासच्या बाजूने उभा राहणारा इराण हा एकमेव देश आहे. पाकिस्तान आणि इराण एकमेकांचे नुकसान करीत आहेत ही काही चांगली गोष्ट नाही. कारण कोणत्याही तणावाचे आर्थिक परिणाम भीषण असतात. त्यातून इंधनाचा भडका उडू शकतो. इराण आणि पाकिस्तान एकाच माळेचे मणी आहेत. दोन्ही देशांनी एकमेकांवर केलेल्या हल्ल्यामुळे पश्चिम आशियातील तणाव वाढलाआहे. तो निवळणे सा-यांच्याच हिताचेआहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR