इस्लामाबाद : इराणच्या लष्कराने मंगळवारी पाकिस्तानमधील बलुच दहशतवादी गट जैश अल-अदलच्या दोन प्रमुख तळांवर हवाई हल्ले केले. इराक आणि सीरियामध्ये हवाई हल्ले केल्यानंतर एका दिवसानंतर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने पाकिस्तानात घुसून ही कारवाई केली आहे. इराणने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. इराणने केलेल्या या हल्ल्यांमध्ये दोन मुलांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. दरम्यान, पाकिस्तानने बुधवारी इराणमधून आपले राजदूत परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.
इराणच्या माध्यमांनी सांगितले की, बलुच दहशतवादी गटाच्या दोन प्रमुख मुख्यालयांवर (अड्डे) क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला करून ते नष्ट केले गेले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इराणच्या लष्कराने पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताच्या भागात हल्ला केला, जिथे जैश-अल-अदलचे सर्वात मोठे मुख्यालय होते. इराणने केलेल्या बेछूट हल्ल्यात दोन निष्पाप मुले मारली गेली, तर तीन मुली जखमी झाल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.
पाकिस्तानने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इराणने पाकिस्तानच्या सार्वभौमत्वावर विनाकारण केलेला हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे आणि संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरच्या उद्देशांचे आणि तत्त्वांचे उल्लंघन आहे. हे बेकायदेशीर कृत्य पूर्णपणे अस्वीकार्य असून त्याचे कोणतेही समर्थन नसल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. या बेकायदेशीर कृतीला उत्तर देण्याचा अधिकार पाकिस्तानने राखून ठेवला आहे. या परिणामांची जबाबदारी संपूर्णपणे इराणवर राहील, असे पाकिस्तानने म्हटले आहे.
सर्व उच्चस्तरीय भेटी रद्द
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, इराणचे राजदूत आता कधीही पाकिस्तानात परत येऊ शकणार नाहीत. दोन्ही देशांमधील वर्तमान आणि भविष्यातील सर्व उच्चस्तरीय भेटी रद्द करण्याची घोषणाही पाकिस्तानने केली आहे. इराण सरकारला पाकिस्तानच्या निर्णयाची माहिती देण्यात आल्याचेही प्रवक्त्याने म्हटले आहे.