पाटणा : बिहारच्या शिक्षण विभागाने गेल्या महिन्यात भरती झालेल्या सुमारे एक लाख शिक्षकांच्या फेरपडताळणीचे आदेश दिले आहेत. प्रवेश परीक्षा देणारे उमेदवार आणि नियुक्ती घेणारे उमेदवार वेगळे असल्याची तक्रार विभागाकडे आली होती, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव के. पाठक यांनी २८ डिसेंबर रोजी सर्व जिल्हा दंडाधिकार्यांना लिहिलेल्या पत्रात १५ जानेवारीपासून फेरपडताळणी मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत.
पत्रात म्हटले आहे की, सर्व डीएमना सूचित केले जाते की नवनियुक्त शिक्षकांना पुनर्पडताळणीसाठी वेगवेगळ्या गटांमध्ये विभागून त्यांना बोलावा आणि प्रवेश परीक्षेच्या वेळी आयोगाने त्यांच्या अंगठ्याचे ठसे घेतले होते त्या सोबत त्यांच्या अंगठ्याचे ठसे जोडून पहा. या वर्षी २ नोव्हेंबर रोजी, बिहार सरकारने राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये शिक्षक भरती परीक्षा उत्तीर्ण झालेल्या १,२०,३३६ शिक्षकांना नियुक्ती पत्र प्रदान केले होते. आयोगाने राज्यातील विविध विषयांच्या शिक्षकांच्या एकूण ८६,५५७ पदे भरण्यासाठी टीआरई- २ चा निकाल नुकताच जाहीर केला आहे.
यापूर्वी फसवणुकीच्या तक्रारींनंतर विभागाने अचानक निवडलेल्या चार हजार शिक्षकांना फेरपडताळणीसाठी बोलावले होते. यादरम्यान, प्रवेश परीक्षेला बसलेले उमेदवार आणि नियुक्ती मिळालेली व्यक्ती एकच आहे की नाही, याची पडताळणी करण्यात आली. या प्रक्रियेत विभागाने तीन घोटाळेबाज ओळखले. याशिवाय नियुक्ती घेऊन फरार झालेल्या तीन शिक्षकांची ओळख पटली. विभागाने अशा लोकांवर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.