मुंबई (प्रतिनिधी) : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यात नॅशनल कॉन्फरन्सने काश्मीरसाठी वेगळा झेंडा निर्माण करू, ३७०, ३५ (अ) कलम पुन्हा लागू करू आदी आश्वासने दिली आहेत. या आश्वासनांशी काँग्रेस, उद्धव ठाकरे सहमत आहेत का? असा सवाल करताना उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी आज केली. कलम ३७० पुरुज्जीवित करण्याचे काश्मीरसाठी स्वतंत्र झेंडा तयार करण्याचे आश्वासन देणे नॅशनल कॉन्फरन्सच्या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.
भारत निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीर विधानसभेसाठी निवडणूक जाहीर केली आहे. या निवडणुकीसाठी नॅशनल कॉन्फरन्सने घोषित केलेल्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची माहिती देत शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. नॅशनल कॉन्फरन्सने ३७० आणि ३५ (अ) ही घटनेतील कलमे पूर्ववत करू, काश्मीरसाठी पूर्वीप्रमाणे स्वतंत्र झेंडा तयार करू, असे आश्वासन दिले आहे. काँग्रेस नेतृत्वाने, उद्धव ठाकरे यांनी नॅशनल कॉन्फरन्सच्या या आश्वासनाशी आपण सहमत आहोत का, हे स्पष्ट करावे. नॅशनल कॉन्फरन्सने देशविघातक भूमिका घेतली आहे. काश्मीरमध्ये पूर्वीसारखी स्थिती करण्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचे याला समर्थन आहे का? असा सवाल शेलार यांनी केला.