22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeअंतरराष्ट्रीयइस्रायलचा गाझावर रात्रभर बॉम्बवर्षाव

इस्रायलचा गाझावर रात्रभर बॉम्बवर्षाव

दीर अल-बलाह : इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात सामान्य लोकांचे नाहक जीव जात आहेत. रिपोर्टनुसार, मध्य गाझापट्टीतील नुसिरत शहरी निर्वासित शिबिरावर इस्रायलने रात्रभर केलेल्या हवाई हल्ल्यात ५ महिन्यांच्या बाळासह किमान १५ लोक ठार झाले. हमासद्वारे संचालित आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, युद्धाच्या सुरुवातीपासून मृतांची संख्या २६,००० हून अधिक जास्त झाली आहे. इस्त्रायली सैन्याने दक्षिण गाझामधील खान युनिस शहरात प्रवेश केला. इस्रायली लष्कराने शुक्रवारी तीन शेजारील भाग आणि खान युनिस निर्वासित शिबिर रिकामे करण्याचे आदेश दिले.

युद्धाच्या सुरुवातीपासून मरण पावलेल्या पॅलेस्टिनींची संख्या २६,०८३ वर पोहोचली आहे, तर ६४,४८७ पॅलेस्टिनी जखमी झाले आहेत. मंत्रालयाने मृतांच्या संख्येत लढाऊ आणि नागरिक यांच्यात फरक केला नाही, परंतु मृत्यू झालेल्यांमध्ये जवळपास दोन तृतीयांश महिला आणि मुलांचा समावेश असल्याचे गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले. गेल्या २४ तासांत १८३ जणांचा मृत्यू झाला असून ३७७ जण जखमी झाले आहेत, असे मंत्रालयाचे प्रवक्ते अश्रफ अल-किद्रा यांनी एका निवेदनात सांगितले. दरम्यान, हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला होता, ज्यामध्ये सुमारे १२०० इस्रायली मारले गेले होते.

दरम्यान, संयुक्त राष्ट्राच्या सर्वोच्च न्यायालयाने गाझामध्ये तात्काळ युद्धबंदीचे आदेश देण्यास नकार दिला, परंतु इस्रायलला जीवित आणि मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले. हा खटला दाखल करणा-या दक्षिण आफ्रिकेने इस्रायलला आपली लष्करी मोहीम थांबवण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती न्यायालयाला केली होती. गाझामधील नरसंहाराचा इस्त्रायलवर आरोप असलेला खटला ते फेटाळणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. नरसंहाराचे आरोप फेटाळण्याचे इस्रायलचे अपीलही न्यायालयाने फेटाळले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR